आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

कसोटी संघातून वगळण्यात आल्यामुळे या खेळाडूची गांगुली व द्रविडवर जहरी टीका; तर या संदर्भात मुलाखत देण्यासाठी त्याला आला धमकीचा संदेश!


श्रीलंकेविरुद्ध कसोटी संघातून भारताचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाला डच्चू देण्यात आला. यानंतर संघात निवड न झालेल्या साहाला धमक्यांचा सामना करावा लागत आहे. एका पत्रकाराने साहाला व्हॉटसअॅपवर धमकी दिली आहे. त्यानं याचा एक स्क्रीनशॉटसुद्धा शेअर केला आहे. मुलाखत देण्यासाठी पत्रकाराकडून धमकी दिली जात असल्याचा आरोप साहाने केला आहे.

साहाने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये पत्रकाराने त्याला मुलाखतीबाबत विचारल्याचं आणि शेवटी धमकी दिल्याचंही दिसतं. पत्रकार म्हणतो की, मला एक मुलाखत दिलीत तर चांगलं होईल. त्याला सिलेक्टर्सनी फक्त एक यष्टीरक्षक म्हणून निवडलं आहे. कोण बेस्ट आहे? तु ११ पत्रकारांना निवडण्याचा प्रयत्न केलास तो माझ्या मते योग्य नाही. त्याला निवड जे जास्त मदत करू शकतील. तु कॉल केला नाहीस. आता मी तुझी मुलाखत घेणार नाही आणि मी हे लक्षात ठेवेन असा इशाराही पत्रकाराने साहाला दिला आहे.

बीसीसीआयने शनिवारी आगमी श्रीलंकाविरुद्धच्या तीन ट्वेंटी-२० व दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. रोहित शर्माकडे आता अधिकृतपणे कसोटी संघाचेही कर्णधारपद गेले आहे. पण, या मालिकेसाठीच्या कसोटी संघात स्थान न मिळालेल्या यष्टिरक्षक वृद्धिमान साहाने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यावर टीका केली आहे.

न्यूझीलंडविरुद्ध नोव्हेंबर महिन्यात मान दुखत असूनही ६१ धावांची खेळी मी केली होती आणि त्यानंतर मला निवृत्ती घेण्याचा सल्ला राहुल द्रविडने दिला होता. “न्यूझीलंडविरुद्ध मी मानेच्या दुखापतीसह खेळलो होतो आणि आम्ही विजयाच्या नजीक पोहोचलोच होतो. तेव्हा दादा ( गांगुली) मला म्हणाला होता, की जोपर्यंत मी इथे आहे, तोपर्यंत तुला चिंता करण्याची गरज नाही. त्याच्या त्या वाक्याने मला मानसिक प्रेरणा मिळाली होती. पण, दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर चित्र परस्पर विरोधी दिसले. मला धक्काच बसला. एका कसोटी मालिकेनंतर असे काय घडले, हेच मला कळेनासे झाले. माझं वाढतं वय कारणीभूत आहे की काही?, दादा काही वेगळंच म्हणाला होता आणि प्रत्यक्षात त्याच्या विरुद्ध सगळे घडले. त्यामुळेच मला अधिक धक्का बसला,”असे वृद्धिमान साहाने सांगितले.

तो पुढे म्हणाला,”आता संघ जाहीर झालाच आहे, तर मी संघ निवडीत काय झाले याचा खुलासा करतो. राहुल द्रविड यानेही मला संकेत दिले होते, की तुला संघातून वगळण्याची चर्चा सुरू आहे. त्याने अप्रत्यक्षरित्या मला निर्णय घेण्यास सांगितले.” ३७ वर्षीय वृद्धिमान साहा आता भारताच्या क्रिकेट भविष्यातील वाटचालीचा भाग नसेल. निवड समिती प्रमुख चेतन शर्मा म्हणाले,”आम्ही वयाला इतकं महत्त्व देत नाही. पण, जेव्हा एखादा युवा खेळाडू संघाबाहेर असतो, तेव्हा त्याला संधी देण्याचा विचार निवड समिती नक्कीच करते.” साहाने ४० कसोटी सामन्यांत १३५३ धावा केल्या आहेत . त्यात तीन शतकांचा समावेश आहे. त्याने यष्टिंमागे १०४ बळी टिपले असून त्यात ९२ झेल व १२ यष्टिचीतचा समावेश आहे.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here