आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

तब्बल ५६ चौकाराच्या साथीने या २२ वर्षीय फलंदाजाने ३८७ चेंडूत त्रिशतक पूर्ण केले


बिहारचा रणजी क्रिकेटपटू सकीबुल गनीने पदार्पण करताच इतिहास रचला आहे. या फलंदाजाने शानदार फलंदाजी करताना त्रिशतक ठोकले आहे. यासह प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पणात त्रिशतक झळकावणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी जागतिक क्रिकेटमध्ये इतर कोणत्याही फलंदाजाने अशी कामगिरी केलेली नाही.

२२ वर्षीय सकीबुल गनीने मिझोरामविरुद्धच्या रणजी पदार्पणात ही कामगिरी केली. शतक झळकावल्यानंतर तो पहिल्या दिवशी नाबाद राहिला. यानंतर दुसऱ्या दिवशीही त्याच लयीत फलंदाजी करत सकिबुलने त्रिशतक झळकावले. ४०५ चेंडूत ३४१ धावा करून तो बाद झाला. या खेळी दरम्यान त्याच्या बॅटमधून ५६ चौकार आणि २ षटकार निघाले.

सकिबुलने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये प्रवेश करण्यापूर्वी लिस्ट ए क्रिकेट देखील खेळले आहे. यामध्ये त्याच्या नावावर ३३७ धावा आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत ११ सामन्यात १९२ धावा केल्या आहेत. सकिबुलसह बाबुल कुमारनेही धडाकेबाज खेळी केली आणि चौथ्या विकेटसाठी दोघांनी मिळून ५३८ धावांची मोठी भागीदारी केली. बाबुल कुमारनेही आपले द्विशतक पूर्ण केले.

याआधी हा विक्रम अजय रोहराच्या नावावर होता. त्याने प्रथम श्रेणी पदार्पणात अशी केली होती. रोहराने नाबाद २६७ धावा केल्या. साकिबुलने हा मोठा विक्रम मागे टाकला आहे. ७१ धावांत बिहारने ३ गडी गमावले होते, त्यावेळी तो फलंदाजीला आला. आणि त्यानंतर जे घडले, ते इतिहासाच्या पानावर नोंदवले गेले. रणजी ट्रॉफीच्या या हंगामाला गुरुवारपासून सुरुवात झाली.

१९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या कर्णधार यश धुलनेही दिल्लीसाठी पदार्पण केले. धुलनेही पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावले. पहिल्या दिवशी ११३ धावा करून तो बाद झाला. त्याचबरोबर अजिंक्य रहाणेनेही रणजी स्पर्धेत शतक झळकावत टीकाकारांना चोख उत्तर दिलं आहे. अजिंक्य गेल्या काही महिन्यांपासून धावांचा दुष्काळ अनुभवत होता, त्यामुळे तो आता भारतीय संघाच्या बाहेर जाणार, असे म्हटले जात होते. पण अजिंक्यने शतक झळकावत संघातील स्थान कायम ठेवल्याचे म्हटले जात आहे.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here