आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

साहा धमकी प्रकरणात शास्त्रींची उडी तर द्रविड म्हणतो मी अजिबात दु:खी नाही; BCCI ने घेतली ही भूमिका


श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाची भारतीय संघात निवड करण्यात आलेली नाही. यानंतर, माध्यमांसमोर साहाने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासोबत झालेले संभाषण समोर आणले. साहाने एका पत्रकाराने सोशल मीडियावर दिलेल्या धमकीचा स्क्रीनशॉट शेअर केल्याने वाद आणखी वाढला. वृद्धिमान साहाने रविवारी केलेल्या विधानामुळे खळबळ उडाली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर प्रशिक्षक राहुल द्रविड, राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी अप्रत्यक्षपणे आपल्याला निवृत्ती पत्करण्याचे संकेत दिले, असा आरोप साहाने केला.

भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांनीही ट्विट करून साहाचे समर्थन केले आहे. एका पत्रकाराकडून खेळाडूला धमकावले जात आहे, हे आश्चर्यकारक आहे, असे त्यांनी लिहिले आहे. हा आपल्या पदाचा दुरुपयोग आहे, असेही ते पुढे म्हणाले. भारतीय संघासोबत हे सातत्याने घडत आहे. एवढेच नाही तर माजी प्रशिक्षकाने बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी या प्रकरणाकडे गांभिर्याने पाहावे, असे म्हटले आहे. ती व्यक्ती कोण आहे हे शोधून काढावे अशी भावना शास्त्रींनी बोलून दाखवली आहे. हे प्रत्येक क्रिकेटपटूच्या हिताचे आहे, असा उल्लेखही त्यांनी केलाय.

काय आहे प्रकरण?

“न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीनंतर दादाने (सौरव गांगुली) मला मेसेज केला आणि माझ्या खेळीसाठी अभिनंदन केले. त्याने माझा आत्मविश्वास वाढवला. गांगुलीने माझे कौतुक करतानाच तो ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष असेपर्यंत संघातील स्थानाची चिंता करू नये, असे आश्वासन दिले. यामुळे माझा आत्मविश्वास वाढला होता. पण त्यानंतर एका महिन्यातच चित्र पालटले,” असे साहाने मुलाखतीत सांगितले होते. त्याचवेळी राहुल द्रविडबद्दल बोलताना, “मला संघ व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले होते की आता माझ्या नावाचा विचार केला जाणार नाही. राहुल द्रविडनेही मी निवृत्तीचा विचार करावा,” असा सल्ला दिला होता, असे साहाने म्हटले.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, याप्रकरणात बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने प्रतिक्रिया दिली आहे. साहा अद्याप बीसीसीआयशी करारबद्ध आहे. त्यामुळे बीसीसीआयने त्याचे आरोप गंभीरतेनं घेतले असून याप्रकरणाची सखोल तपास करण्याचा निर्णय घेतला आहे. अन्य खेळाडूंसोबतही असा प्रकार घडतोय का? याची देखील चौकशी होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here