आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

हा मराठी खेळाडू होऊ शकतो भारतीय संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक, वरिष्ठ खेळाडूंची पहिली पंसती!


भारताचा माजी दिग्गज खेळाडू अजित आगरकर आगामी काळात टीम इंडियाच्या गोलंदाजी प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसू शकतो. २०१३ नंतर आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याकडे आता भारतीय संघाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे सध्या संघात अनेक बदल करण्यात येत आहेत. अलीकडेच माजी खेळाडू राहुल द्रविडची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर विराटऐवजी रोहित शर्माला संघाचा कर्णधार बनवण्यात आले. आता संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक बदलला जाणार आहे. संघातील एका अनुभवी खेळाडूने याबाबत इच्छा व्यक्त केली आहे.

अजित आगरकरचं नाव आघाडीवर

सध्या, भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे आहेत, ज्यांनी राहुल द्रविडसह पदभार स्वीकारला आहे. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, आता त्यांना पदावरून हटवण्याचे बोलले जात आहे. वास्तविक, भारतीय संघाचा गोलंदाज प्रशिक्षक अनुभवी खेळाडू असावा, असे संघातील वरिष्ठ खेळाडूचे मत आहे.

म्हांब्रे यांना केवळ ५ आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आहे. जरी त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे आणि कोचिंगचा अनुभव आहे. मात्र भारतीय संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा अनुभव असणारी व्यक्ती असावी, असे मत संघाच्या वरिष्ठ खेळाडूने व्यक्त केले. यासाठी अजित आगरकर पहिली पसंती असल्याचं मानलं जात आहे.

अजित आगरकरची कारकिर्द

अजित आगरकर १९९८ ते २००९ पर्यंत भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजीचा एक भाग होता. अजितने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत २८ कसोटी सामन्यांमध्ये ५८, १९१ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २८८, तसेच ४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३ बळी घेतले आहेत. त्यामुळे अजित आगरकरला आंतरराष्ट्रीय सामन्यांचा भरपूर अनुभव आहे.

अजित आगरकर हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान ५० बळी घेणारा गोलंदाज आहे. याशिवाय भारतासाठी एकदिवसीय प्रकारामध्ये सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. सध्या अजित आगरकर टेलिव्हिजन समालोचनाचे काम करत आहे. मात्र गेल्या वर्षी तो भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्याचा प्रमुख दावेदार मानला जात होता. अशा परिस्थितीत अजित आता आयसीसी विश्वचषक २०२३ पर्यंत भारतीय संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक होऊ शकतो. कारण संघातील मोठे निर्णय घेणाऱ्या संघातील वरिष्ठ खेळाडूला अजितला त्या भूमिकेत पाहायचे आहे.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here