आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

मोहम्मद शामीने पहिल्यांदाच सोडले मौन हिजाब प्रकरणात केले भाष्य; म्हणाला भारतीय संस्कृती ही…


हिजाबवरुन कर्नाटकमध्ये सुरु असलेल्या वादाचे परिणाम संपूर्ण देशभरात पहायला मिळत आहेत. फक्त देशात नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरुन प्रतिक्रिया उमटत आहेत. कर्नाटकमधील ७५ हजारांपैकी फक्त आठ उच्च माध्यमिक विद्यालये आणि कनिष्ठ महाविद्यालयांत हिजाबचा वाद असल्याचे कर्नाटक सरकारने गुरुवारी सांगितलं असून हा मुद्दा सोडवण्यात येईल असा विश्वास सरकारने व्यक्त केला. दरम्यान भारतीय संघाचा क्रिकेटर मोहम्मद शामीने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

मोहम्मद शामीने टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत हिजाब वादावर भाष्य केलं. तो म्हणाला की, “मला कोणत्याही वादात पडायचं नाही. पण जिथपर्यंत कपड्यांचा आणि संस्कृतीचा प्रश्न आहे तर ते प्रत्येक कुटुंबाला माहिती असतं. ते आपापल्या पद्दतीने सांभाळलं पाहिजे. ही पालकांची जबाबदारी आहे”.

हिजाब वादाशी संबंधित सर्व याचिकांवर निर्णय होईपर्यंत कर्नाटक उच्च न्यायालयाने एका अंतरिम आदेशाद्वारे सर्व विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचा धार्मिक पेहराव करून वर्गात बसण्यास मनाई केली होती. तथापि, गुरुवारीदेखील काही विद्यार्थिनींनी ‘हिजाब’ व ‘बुरखा’ घालून वर्गात बसून द्यावे असा हट्ट कायम ठेवल्याने हा वाद शमला नाही.

ही ‘समस्या’ काही मोजक्या उच्च माध्यमिक विद्यालये आणि कनिष्ठ महाविद्यालयांतच आहे, असे कर्नाटकचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांनी येथे पत्रकारांना सांगितले. ‘७५ हजार शाळा व महाविद्यालयांपैकी आठ महाविद्यालयांतच ही ‘समस्या’ आहे. आम्ही यावर तोडगा काढू. सर्व विद्यार्थ्यांनी आमच्या आदेशाचे पालन केले याबद्दल आम्हाला आनंद आहे’, असे ते म्हणाले.

कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात हिजाब (हेडस्कार्फ)वरून वाद सुरू झाला. हिजाब घालून महाविद्यालयात प्रवेश करणाऱ्या मुस्लीम विद्यार्थिनींना महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात आला. कर्नाटक राज्य सरकारने जारी केलेल्या ड्रेस कोडबाबतच्या नियमानुसार हिजाब परिधान करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असा कडक आदेश महाविद्यालयीन अधिकाऱ्यांनी देऊनही काही मुस्लीम विद्यार्थिनी आपल्या पालकांसह महाविद्यालयात आल्या असता त्यांना महाविद्यालयीन परिसराच्या बाहेर उभे करण्यात आले. त्यामुळे मुलींसह त्यांच्या पालकांनीही गेटबाहेर निदर्शने केली. त्याचवेळी या मुलींचा निषेध करण्यासाठी काही हिंदू विद्यार्थी भगवे उपरणे घालून महाविद्यालयाच्या परिसरात फिरत होते. त्यामुळे हा विषय अधिकच चिघळला.

जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला हा प्रकार उडुपी येथील सरकारी मुलींच्या कनिष्ठ महाविद्यालयात घडला. सहा विद्यार्थिनींनी ड्रेस कोडचे उल्लंघन करून हिजाब घालून वर्गात हजेरी लावली होती. महाविद्यालयाने वर्गाव्यतिरिक्त इतरत्र हिजाब घालण्याची परवानगी दिली होती.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here