आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

युवराजचे लाडक्या चीकूसाठी भावनिक पत्र अन् भेट; म्हणाला, तुझ्या आतील आग नेहमी तेवत ठेव, तू सुपरस्टार आहेस!


भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याच्यावर बॅट जणू रूसली आहे. दोन वर्षांत त्याला एकही आंतरराष्ट्रीय शतक झळकावता आलेलं नाही. त्यात त्यानं टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या आधीपासून कर्णधारपद सोडण्याचा जो सपाटा लावलाय, त्यामुळे त्याच्यावर टीकाही होतेय. त्याला विराटने उत्तरही दिले आणि बीसीसीआय अध्यक्ष विरुद्ध विराट आणि निवड समिती विरुद्ध विराट असा सामना रंगला.

तीनही प्रकारातील  कर्णधारपद सोडल्यानंतर विराटचे आता संघातील स्थानही धोक्यात आल्याची चर्चा सुरू आहे, कारण त्याचा फॉर्म तसा चांगला नाही. या सर्व नकारात्मक गोष्टी विराटच्या अवतीभवती फिरत असताना भारताचा माजी स्टार खेळाडू युवराज सिंग याने विराटसाठी भावनिक पत्र लिहिले आहे. त्याने विराटला खास भेटवस्तू पाठवली आहे.

युवराजने लिहिले की,”विराट, मी तुला एक क्रिकेटर आणि एक व्यक्ती म्हणून वाढताना पाहिले आहे. भारतीय क्रिकेटच्या दिग्गजांच्या खांद्याला खांदा लावून चालणार्‍या नेटमधील त्या तरुण मुलापासून ते आता तू स्वत: एक दिग्गज बनला आहेस आणि नवीन पिढीला मार्ग दाखवत आहेस. तुझी शिस्त आणि मैदानावरील महत्त्वकांक्षा आणि खेळाप्रती असलेले समर्पण या देशातील प्रत्येक तरुण मुलाला बॅट उचलण्याची आणि एक दिवस निळी जर्सी घालण्याचे स्वप्न पाहण्यास प्रेरित करते.”

”तू प्रत्येक वर्षी तुझा क्रिकेटचा स्तर उंचावला आहेस आणि आधीच इतके काही साध्य केले आहेस की, तुझ्या कारकिर्दीतील नवीन अध्याय सुरू करताना पाहून मला आणखी आनंद होतो. तू एक महान कर्णधार आणि उत्कृष्ट लिडर आहेस. मी तुझ्याकडून आणखी अनेक विक्रमांची अपेक्षा करतोय. एक सहकारी आणि त्याहूनही अधिक मित्र म्हणून तुझ्यासोबत एक नाते जुळले आहे आणि त्याचा मला आनंद आहे. धावा करणे, लोकांची फिरकी घेणे, जेवताना टिंगळटवाळी करणे, पंजाबी गाण्यांवर नाचणे आणि चषक जिंकणे, हे सर्व तुझ्यासोबत मी केलं आहे. मेरे लिए तू हमेशा चीकू रहेगा और दुनिया के लिए किंग कोहली,”असेही त्याने लिहिले आहे.

”तुझ्यातील आग नेहमी तेवत ठेव. तू सुपरस्टार आहेस. तुझ्यासाठी हा खास गोल्डन बूट. देशाला तुझा अभिमान आहे,”असेही युवीने लिहिले आहे.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here