आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

ईशान किशन च्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने उडवला श्रीलंकेचा धुव्वा!


भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी-२० सामना लखनऊच्या एकना स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात भारताने लंकेला ६२ धावांनी मात देत मालिकेत १-० अशी विजयी आघाडी घेतली. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर फलंदाज ईशान किशन (८९) आणि श्रेयस अय्यर (५७) यांच्या वादळी खेळींमुळे भारताने २० षटकात २ बाद १९९ धावा ठोकल्या.

भारताकडून अष्टपैलू खेळाडू दीपक हुडाने पदार्पण केले. प्रत्युत्तरात श्रीलंकेच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करली. चरिथ असलांकाशिवाय (नाबाद ५३) इतर खेळाडू धावा जमवण्यात अपयशी ठरले. त्यांना २० षटकात ६ बाद १३७ धावांपर्यंत पोहोचता आले.

रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी भारताला दमदार सुरुवात करून दिली. मागील काही सामन्यात संथ वाटणाऱ्या ईशानने स्फोटक फलंदाजी करत रोहितला साथ दिली. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी १११ धावांची खेळी केली. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लाहिरू कुमाराने रोहितचा त्रिफळा उडवत ही भागीदारी मोडली. रोहितने २ चौकार आणि एका षटकारासह ४४ धावांची खेळी केली. या धावांसह तो आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. त्यानंतर इशानने श्रेयस अय्यरसोबत धावा कुटल्या.

शतकाकडे वाटचाल करणाऱ्या ईशानला लंकेचा कप्तान दासुन शनाकाने माघारी धाडले. ईशानने १० चौकार आणि ३ षटकारांसह ८९ धावा ठोकल्या. शेवटच्या काही षटकात श्रेयसने रवींद्र जडेजासोबत धावा जमवल्या. २०व्या षटकात श्रेयसने आपले झटपट अर्धशतक पूर्ण केले. श्रेयसने २८ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ५७ धावा ठोकल्या. २० षटकात भारताने २ बाद १९९ धावा केल्या.

भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने श्रीलंकेला चांगली सुरुवात करू दिली नाही. त्याने सलामीवीर पाथुन निसांकाची शून्यावर दांडी गुल केली, तर कामिल मिशाराला (१३) रोहितकरवी झेलबाद केले. त्यानंतर व्यंकटेश अय्यरने जेनिथ लियानागेला आणि रवींद्र जडेजाने अनुभवी दिनेश चंडीमलला माघारी धाडत लंकेची अवस्था खिळखिळी केली.

१० षटकात श्रीलंकेने ४ बाद ५७ धावा केल्या. पुढच्याच षटकात फिरकीपटू यजुर्वेंद्र चहलने कप्तान दासुन शनाकाला (३) झेलबाद करत लंकेचे कंबरडे मोडले. एका बाजूने चरिथ असलांकाने किल्ला लढवला. १९व्या षटकात त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले पण त्याला कोणाचीही साथ मिळाली नाही. २० षटकात श्रीलंका संघ ६ बाद १३७ धावांपर्यंतच पोहोचू शकला.

भारताने हा सामना ६२ धावांनी जिंकला. असलांका ५ चौकारांसह ५३ धावांवर नाबाद राहिला. भारताकडून भुवनेश्वर कुमार आणि व्यंकटेश अय्यर यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. ईशान किशनला सामनावीर घोषित करण्यात आले.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here