आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

अखेरच्या सामन्यात भारत सहा गडी राखून विजयी; न्यूझीलंडला निर्विवाद वर्चस्व मिळवण्यापासून रोखले


भारताची सलामीवीर स्मृती मानधना (८४ चेंडूंत ७१ धावा), उपकर्णधार हरमनप्रीत कौर (६६ चेंडूंत ६३) आणि कर्णधार मिताली राज (६६ चेंडूंत नाबाद ५४) या अनुभवी खेळाडूंच्या अप्रतिम फलंदाजीमुळे भारतीय महिला संघाने गुरुवारी पाचव्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडवर सहा गडी आणि २४ चेंडू राखून सरशी साधली.

यजमान न्यूझीलंडने दिलेले २५२ धावांचे लक्ष्य भारतीय संघाने ४६ षटकांत गाठले. या विजयासह भारताने न्यूझीलंडला मालिकेत (१-४) निर्विवाद वर्चस्व मिळवण्यापासून रोखले.

या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी आधी न्यूझीलंडला ५० षटकांत ९ बाद २५१ धावांवर रोखले. न्यूझीलंडच्या अमिलिया करने ६६ धावांची खेळी केली. त्यानंतर २५२ धावांचा पाठलाग करताना भारताच्या शेफाली वर्मा (९) आणि दीप्ती (२१) लवकर बाद झाल्या.

मात्र, स्मृती आणि हरमनप्रीत यांनी तिसऱ्या गडय़ासाठी ६४ धावांची भागीदारी रचत भारताला सावरले. स्मृती ७१ धावांची खेळी करून माघारी परतल्यावर हरमनप्रीत आणि मिताली यांनी चौथ्या गडय़ासाठी ७२ धावांची भागीदारी रचत भारताचा विजय सुनिश्चित केला.

संक्षिप्त धावफलक

न्यूझीलंड : ५० षटकांत ९ बाद २५१ (अमिलिया कर ६६; स्नेह राणा २/४०) पराभूत वि. भारत : ४६ षटकांत ४ बाद २५२ (स्मृती मानधना ७१, हरमनप्रीत कौर ६३, मिताली राज नाबाद ५४; हेली जेन्सन १/२९)

सामनावीराचा पुरस्कार स्मृती मानधनाला देण्यात आला

अलीकडच्या काळातील निराशाजनक कामगिरीमुळे हरमनप्रीतच्या संघातील स्थानाविषयी प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, तिने अखेरच्या सामन्यात ६३ धावांची खेळी साकारली. त्यामुळे संघाला दिलासा मिळाल्याचे स्मृती मानधना म्हणाली. ‘‘हरमनला फटकेबाजी करताना पाहून आनंद वाटला. विश्वचषकाच्या दृष्टीने तिला सूर गवसणे गरजेचे आहे,’’ असे स्मृतीने सांगितले.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here