आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब
===
“या स्तरावर अशा कामगिरीची अपेक्षा नाही”, विजयानंतर कर्णधार रोहितने व्यक्त केली नाराजी
भारत विरुद्ध श्रीलंका टी-२० मालिकेतील पहिला सामना रोहितच्या नेतृत्वाखाली गुरुवारी भारताने सहज जिंकला. डावखुरा यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन (५६ चेंडूंत ८९ धावा) आणि मुंबईकर श्रेयस अय्यर (२८ चेंडूंत नाबाद ५७) यांच्या धडाकेबाज अर्धशतकांच्या बळावर भारताने पहिल्या टी-२० सामन्यात श्रीलंकेवर ६२ धावांनी विजय मिळवला. मात्र या दमदार विजयानंतरही भारताचा कर्णधार रोहित शर्मा संघाच्या एका गोष्टीवर नाराज आहे. त्याने ही नाराजी सामन्यानंतर बोलताना उघडपणे बोलून दाखवलीय हे विशेष.
https://www.bcci.tv/videos/5556379/ind-vs-sl-2022-1st-t20i-match-presentation?tagNames=2022
भारताने २० षटकांत २ बाद १९९ अशी धावसंख्या उभारली. भारताचे सलामीवीर किशन आणि कर्णधार रोहित शर्मा (४४) यांनी डावाच्या सुरुवातीपासून श्रीलंकन गोलंदाजांवर हल्ला चढवला. त्यांनी १११ धावांची सलामी दिल्यावर रोहितला लाहिरू कुमाराने बाद केले. यानंतर किशन आणि श्रेयस यांनी आक्रमक शैलीतील फलंदाजी सुरू ठेवली. किशनचे शतक हुकले. त्याने ५६ चेंडूंत १० चौकार आणि तीन षटकारांच्या साहाय्याने ८९ धावांची खेळी केली. तो बाद झाल्यावर श्रेयसने फटकेबाजी करत भारताला २०० धावांसमीप पोहोचवले.
भारताच्या २०० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने २० षटकांत ६ बाद १३७ धावांपर्यंतच मजल मारली. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. श्रीलंकेने सुरुवातीपासून ठरावीक अंतराने गडी गमावले. त्यांच्या अव्वल सहा फलंदाजांपैकी डावखुऱ्या चरिथ असलंकाला (नाबाद ५३) भारतीय गोलंदाजांचा प्रतिकार करता आला.
मात्र या विजयानंतर रोहितने भारतीय संघाबद्दल नाराजी व्यक्त केलीय. भारतीय संघाने योग्य पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं नाही असं रोहित म्हणालाय. भारतीय संघाने काही सोपे झेल सोडल्याबद्दल रोहितने नाराजी व्यक्त केली. “आता हे सतत होत आहे. आम्ही सोपे झेल सोडतोय. या स्तरावर खेळताना अशा कामगिरीची अपेक्षा नसते. आमच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकांना आणखी काम करावं लागणार आहे. आम्हाला आमच्या क्षेत्ररक्षणामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या आधी आम्हाला एक उत्तम क्षेत्ररक्षण करणारा संघ होणं आवश्यक आहे. आता यापुढे यापद्धतीच्या चुकांना कोणतेही स्थान नसणार,” असं रोहितने स्पष्ट केलंय.
==
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.