आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

रोहितच्या नेतृत्वाखाली भारताची विजयी घोडदौड कायम! २-० ने मालिकेवर गाजवले एकहाती वर्चस्व


रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. वेस्ट इंडीजनंतर भारताने श्रीलंकाविरुद्धची टी-२० मालिकाही जिंकली आहे. धर्मशाला येथे खेळला गेलेला दुसरा टी-२० सामना भारताने ७ गडी राखून जिंकला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

सलामीवीर फलंदाज पाथुम निसांकाचे दमदार अर्धशतक आणि कर्णधार दासुन शनाकाच्या वादळी ४७ धावांच्या खेळीमुळे श्रीलंकेने २० षटकात ५ बाद १८३ धावा ठोकल्या. प्रत्युत्तरात भारताकडून श्रेयस अय्यर (नाबाद ७४), संजू सॅमसन (३९) आणि रवींद्र जडेजा (१८ चेंडूत नाबाद ४५) यांनी दमदार फलंदाजी करत श्रीलंकेचे आव्हान १७.१ षटकातच पूर्ण केले. श्रेयस अय्यरला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

पाथुम निसांका आणि दानुषका गुणातिलका यांनी श्रीलंकेला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी ६७ धावा जोडल्या. फिरकीपटू रवींद्र जडेजाने भारताला पहिले यश मिळवून दिले. त्याने गुणातिलकाला व्यंकटेश अय्यरकरवी झेलबाद केले. गुणातिलकाने ४ चौकार आणि २ षटकारांसह ३८ धावा केल्या. त्यानंतर लंकेने मधल्या फळीत चरिथ असलांका (२), कामिल मिशारा (१) आणि दिनेश चंडीमल (९) यांना स्वस्तात गमावले. त्यानंतर निसांकाने श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकासोबत अर्धशतकी भागीदारी रचली. दरम्यान निसांकाने अर्धशतक पूर्ण केले.

१९व्या षटकात भुवनेश्वर कुमारने त्याला पायचीत पकडले. निसांकाने ११ चौकारांसह ७५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. २० षटकात श्रीलंकेने ५ बाद १८३ धावा केल्या. शनाकाने १९ चेंडूत २ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ४७ धावांची खेळी करत लंकेला सन्मानजनक धावसंख्या मिळवून दिली.

इशान किशन (१६) आणि रोहित शर्मा (१) यांना भारताला चांगली सुरुवात करून देता आली नाही. लंकेचा वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमीराने रोहितला त्रिफळाचीत केले, तर लाहिरू कुमाराने इशानचा अडथळा दूर केला. यानंतर मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यरने आपला उत्तम फॉर्म कायम राखत फलंदाजी केली. त्याला प्रथम संजू सॅमंसनची साथ लाभली. या दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली. आक्रमक रुप धारण केलेल्या सॅमसनला कुमाराने झेलबाद केले.

स्लीपमध्ये उभ्या असलेल्या बिनुरा फर्नांडोने त्याचा अप्रतिम झेल घेतला. सॅमसनने २५ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांसह ३९ धावा केल्या. दरम्यान अय्यरने अर्धशतक पूर्ण केले. सॅमसननंतर मैदानात आलेल्या रवींद्र जडेजाने १८ चेंडूत नाबाद ४५ ठोकत भारताचा विजय सोपा केला. त्याने आपल्या खेळीत ७ चौकार आणि एक षटकार ठोकला. तर अय्यरने ६ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ७४ धावांची खेळी केली. १७.१ षटकातच भारताने हे आव्हान पूर्ण केले.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here