आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

श्रीलंकेचा कर्णधार दासुनची एकहाती झुंज अपयशी, भारताने श्रीलंकेला दिला व्हाईटवॅाश!


भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताने तिसरा सामना ६ गडी राखत मालिका ३-० ने जिंकली आहे. या सामन्यात श्रेयस अय्यरने धडाकेबाज असं सलग तिसरं अर्धशतक झळकावत सामना भारताला सहज जिंकवून दिला आहे. भारताने श्रीलंकेचं १४७ धावाचं आव्हान १६.५ षटकामध्ये संपवत सामना जिंकला आहे. वेस्ट इंडीजनंतर आता भारताने श्रीलंकेलाही व्हाईटवॉश दिला आहे.

सामन्यात नाणेफेक जिंकत श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण भारतीय गोलंदाजांनी हा निर्णय चूकीचा ठरवत श्रीलंकेवर पहिल्या षटकापासून भेदक गोलंदाजी करत त्यांचे एक-एक फलंदाज माघारी धाडले. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका याने केवळ एकहाती झुंज देत ३८ चेंडूत २ षटकार आणि ९ चौकार करत ७४ धावा केल्या. ज्यामुळे श्रीलंकेचा संघ किमान १४६ धावा करु शकला.

भारताकडून सर्वच गोलंदाजांनी कसून गोलंदाजी केली. यावेळी आवेश खानने २ तर सिराज, बिश्नोई आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. ज्यानंतर फलंदाजीला आलेल्या भारताचा कर्णधार रोहित स्वस्तात माघारी परतला. इतरही फलंदाजांनी खास कामगिरी केली नाही. पण युवा खेळाडू श्रेयस अय्यरने मात्र अप्रतिम फलंदाजी करत ४५ चेंडूत १ षटकार आणि ९ चौकार करत नाबाद ७३ धावा झळकावल्या. ज्यामुळे भारताने १६.५ षटकात ४ गडी गमावत आव्हान पूर्ण करत सामना ६ विकेट्सनी जिंकला.

मालिकाही भारताच्या नावावर

तीन सामन्यांची टी-२० मालिका भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळवली गेली. यात पहिले दोन सामने भारताने जिंकले होते. भारताने मालिकेतील पहिला सामना भारताने ६२ धावांनी तर दुसरा सामना ७ गडी राखत जिंकला. दरम्यान यामुळे भारताने मालिका आधीच नावावर केली होती. पण आता तिसरा सामनाही ६ गडी राखत जिंकल्यामुळे भारताने श्रीलंकेला ३-० ने व्हाईटवॉश दिला आहे.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here