आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

‘या’ महत्त्वाच्या खेळाडूला डोक्याला दुखापत झाल्याने भारतीय संघाला बसला जबरदस्त धक्का!


भारतीय संघाची प्रमुख फलंदाज सलामीवीर स्मृती मंधाना महिला विश्वचषकाच्या सराव सामन्यादरम्यान जखमी झाली. रविवारी (२७ फेब्रुवारी) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात तिच्या हेल्मेटवर चेंडू आदळल्याने तिला लगेच मैदान सोडावे लागले. त्यामुळे भारतीय संघाचे टेन्शन वाढले होते, पण भारताकडून या सामन्यात हरमनप्रीत कौरने शतक झळकावत एका बाजूने किल्ला लढता ठेवला होता.

क्राईस्टचर्च येथे खेळल्या गेलेल्या या सामन्याच्या सुरुवातीलाच ही घटना घडली. डावखुरी फलंदाज असलेल्या स्मृतीच्या हेल्मेटवर एक वेगवान चेंडू आदळला, त्यामुळे तिला ‘रिटायर्ड हर्ट’ होऊन पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाज शबनीम इस्माईलने यावेळी गोलंदाजी करत होती. २५ वर्षीय मंधानाची भारतीय संघाच्या फिजिओंनी तपासणी केली. त्यानंतर तिने खेळ सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला, पण पुन्हा तिने एका षटकानंतर ‘रिटायर्ड हर्ट’ होण्याचा सल्ला घेतला.

वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला तिला सौम्य मूर्च्छेसारखी कोणतीही लक्षणे आढळली नाहीत, पण खबरदारी म्हणून तिने मैदान सोडले. दक्षिण आफ्रिकेचा डाव सुरू असतानाही ती क्षेत्ररक्षणासाठीही मैदानात आली नव्हती. विलागीकरणामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांमध्येच स्मृतीला खेळण्याची संधी मिळाली. स्मृती भारतीय संघाची महत्त्वाची सदस्य असून शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत तिच्या खेळाकडे सर्वांचे लक्ष असेल.

दरम्यान, हरमनप्रीतच्या ११४ चेंडूत केलेल्या १०३ धावांच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ९ बाद २४४ धावा केल्या. कर्णधार मिताली राज खाते न उघडता धावबाद झाली. यस्तिका भाटियासह हरमनप्रीतने ८४ धावांची भागीदारी केली. भाटियाने ७८ चेंडूत ५८ धावा केल्या. हरमनप्रीतला अयाबोंगा खाकाने बाद केले. खाका ही दक्षिण आफ्रिकेची सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली, तिने २३ धावांत तीन बळी घेतले.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here