आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

हिजाब घालून क्रिकेटचं मैदान गाजवणाऱ्या या एकमेव महिलेबाबत तुम्हाला माहिती आहे का?


देशात सध्या कर्नाटकातील महाविद्यालयात करण्यात आलेल्या हिजाब बंदीवरून वातावरण तापलं आहे. हिजाब समर्थनार्थ राज्यात ठिकठिकाणी आंदोलने देखील करण्यात येत आहेत. काही जण हिजाब बंदीला समर्थन तर काही विरोध दर्शवत आहेत. असं असलं तरी आपल्या धर्माबद्दल अतोनात प्रेम आणि आदर असणाऱ्या व्यक्तीही या समाजात आहेत. एकीकडे हिजाब परिधान केल्यामुळे मुलींना महाविद्यालयात प्रवेश नाकारला जातोय. मात्र, दुसरीकडे अशीही क्रिकेटर आहे जिने हिजाब परिधान करत क्रिकेटचं मैदान गाजवलं आहे. तिचं नाव आहे अबताहा मकसूद.

द हंड्रेड’ या क्रिकेटच्या आगळ्यावेगळ्या स्पर्धेमध्ये अबताह मकसूद सहभगी झाली होती. जुलै २०२१ मध्ये इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेदरम्यान हिजाब घालून अबताहा क्रिकेटच्या मैदानात उतरलेली. आपल्या या कृतीने अबताहा मकसूदने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. अबताहाच्या या कृतीचं कौतुक देखील झालं, तर काहींनी तिच्यावर टीका केली होती. मात्र तिने या कृतीमधून एक आदर्शही निर्माण केल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली.

अबताहा मकसूद ही २२ वर्षीय स्कॉटीश महिला क्रिकेटर आहे. तिचा जन्म ११ जून १९९९ रोजी युनायटेड किंग्डम मधील ग्लासगो शहरात झाला. ब्रिटिश नागरिकत्व असलेली अबताहा मकसूद ही मूळची पाकिस्तानी असून इस्लाम धर्माचं पालन करते. अबताहाला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. ११ वर्षांची असल्यापासून ती क्रिकेट खेळते.

स्कॉटलँड या देशाकडून क्रिकेट खेळणारी अबताहा एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. २०१७ मध्ये झालेल्या महिला विश्वचषक स्पर्धेत अबताहा स्कॉटलँडच्या महिला क्रिकेट टीमकडून खेळली होती. क्रिकेटप्रेमी अबताहाने तायक्वांदो या खेळाचे प्रशिक्षणही घेतलेलं आहे. तायक्वांदो या खेळ प्रकारातील ब्लॅक बेल्ट तिच्याकडे आहे. २०१४ मध्ये ग्लासगो येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेममध्ये तिने देशाचं प्रतिनिधित्व केलं होतं.

एका मुलाखतीदरम्यान अबताहा मकसूदने हिजाब घालून मैदानात उतरल्याचं कारण सांगितलं होतं. “मी कोणत्याही महिला मुस्लिम खेळाडूला हिजाब परिधान करून खेळताना पाहिलेलं नाही. मला हिजाब घालून खेळताना पाहून अनेक मुस्लिम महिलांना धीर येईल आणि प्रेरणा मिळेल.”, असं ती म्हणाली होती.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here