आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

२०-२० षटकांच्या सामन्यांच्या शोधाची जननी अशी एक व्यक्ती आहे की, तुम्ही ऐकूण चकित व्हाल…


महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने २००७ साली जिंकलेला २०-२० षटकांच्या विश्वचषक आणि त्यानंतर वर्षभरात सुरू झालेली इंडियन प्रीमिअर लीग ही स्पर्धा यामुळे टी-२० हा चटपटीत प्रकार भारतीय चाहत्यांनी आपलासा केला. पण कसोटी आणि एकदिवसीय म्हणजेच ५०-५० षटकांचे हे पारंपरिक प्रकार असताना टी-२० प्रकार कोणी शोधून काढला? काही अंदाज तुमचा? २०-२० षटकांच्या प्रकाराचा जनक आहे स्टुअर्ट रॉबर्टसन.

दरवर्षी आयपीएल होतं, मोठ्या प्रमाणावर पैशाची उलाढाल होते. आयपीएलच्या धर्तीवर जगभरात अनेकठिकाणी लीग सुरू झाल्या आहेत. खेळाडूंना पैसा कमावण्याचं, गुणकौशल्य सिद्ध करण्याचं, प्रसिद्धीचं एक व्यासपीठ उपलब्ध झालं आहे.

मात्र ज्या माणसाने हा प्रकार शोधून काढला तो माणूस प्रसिद्धीपासून दूर आहे. कोटीच्या कोटी उड्डाणांपासून तो लांब असतो. हे नाव तुम्ही फार ऐकलं नसेल. हे गृहस्थ कोण असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल. क्रिकेटला नवा आयाम देणाऱ्या या गृहस्थांची ओळख करून देण्यासाठी हा लेखनप्रपंच.

२०००च्या आसपास म्हणजे वायटूकेचा प्रश्न सुटल्यानंतरच्या काळात इंग्लंड क्रिकेट बोर्डाला चिंता भेडसावत होती. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांची घटती लोकप्रियता. मैदानावर येणारे प्रेक्षक कमी कमी होत चालले होते. यामुळे बोर्डाला आर्थिकदृष्ट्या नुकसानाला सामोरं जावं लागत होतं.

हा डोलारा कोसळू नये म्हणून काय करता येईल याकरता बोर्डाने स्टुअर्ट रॉबर्टसन यांच्यावर जबाबदारी सोपवली. रॉबर्टसन तेव्हा इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे मार्केटिंग मॅनेजर म्हूणून काम करत होते. प्रेक्षकसंख्येत १७ टक्क्यांनी घट होणं ऐतिहासिक नव्हतं पण विचार करायला भाग पाडणारं होतं.

लोक कसोटी आणि एकदिवसीय सामन्याला येईनासे का झालेत हे समजून घेण्यासाठी रॉबर्टसन यांनी महत्वाकांक्षी मार्केट रिसर्च सर्व्हे करायचा ठरवला. २५०,००० युरो इतकी प्रचंड रक्कम खर्चून हा सर्वे करण्यात आला. इंग्लंडमधल्या विविध सामाजिक स्तरांमध्ये हा सर्वे घेण्यात आला. नानाविध गोष्टी या सर्व्हेतून समोर आल्या.

कोणी म्हणालं, कसोटी सामना पाच दिवस चालते. पाच दिवस रोज आठ तास कोण बघत बसणार? काही म्हणाले आम्हाला तिकीट परवडत नाही. काहींनी सांगितलं सामन्याचं ठिकाण दूर पडतं. तरुण पोरं म्हणाली हा जेष्ठ नागरिकांसाठीचा खेळ आहे. आमच्या कामाच्या वेळी सामना असतो. काम सोडून सामना बघायला कसं येणार? अनेकांनी सांगितलं की सामना बघण्यासाठी तुम्ही संबंधित क्लबचा, जिमखान्याचं सदस्य असणं अपेक्षित आहे. आम्ही मेंबर नाही, आम्ही कसा सामना बघणार?

महिलांनी सांगितलं की मॅचच्या वेळी मुलांना कुठे ठेवणार? त्यांच्या विरंगुळ्यासाठी ग्राऊंडवर काहीच नसतं. काहीजण म्हणाले मॅच ही ग्रुपने बघण्याची गोष्ट आहे. पाच दिवस, आठ तास किंवा वनडे असेल तर अख्खा दिवस सगळ्यांना शक्य होत नाही. एकट्याने मॅचला जायला बोअर होतं. मार्केट रिसर्च सर्व्हेतून असे असंख्य प्रतिसाद आले. काही सकारात्मक, काही नकारात्मक, काही व्यवहार्य.

रॉबर्टसन यांच्या हे लक्षात आलं की प्रेक्षकांचं आयुष्य बदललं आहे. वेगवान झालं आहे. थोड्या काळात आटोपेल आणि निर्णयही लागेल असं प्रॉडक्ट तयार करणं आवश्यक आहे.

एखादं कुटुंब पिकनिकला किंवा सिनेमा पाहायला गेलं तर तीन तास बाहेर असतं. त्या तीन तासात त्यांचं मनोरंजन होतं, मजा येते. त्या तीन तासात ती गोष्ट अनुभवून संपलेली असते. क्रिकेटची सामनाही तीन तासात आटपून तिचा निर्णय हाती आला तर… सामन्याचा वेळ कमी करायचा तर षटकांची संख्या कमी करायला हवी. तीन तासात सामना संपायला हवी असेल तर २०-२० षटकांचा डाव करावी लागेल हे त्यांच्या लक्षात आलं.

जेणेकरून हा सामना संध्याकाळच्या सत्रात असेल. लोक नोकरी-व्यवसाय करून सामन्याला येऊ शकतील. त्यांच्या घरचेही येऊ शकतील. सामन्याच्या ठिकाणी खाण्यापिण्याची व्यवस्था असेल. लहान मुलांना खेळण्यासाठी काही गोष्टी असतील. मैदानावर डीजे असेल.

आता हे सगळं कागदावर फारच रंजक वाटत असलं तरी बोर्ड पदाधिकाऱ्यांना हे पटणं आवश्यक होतं. कसोटी आणि एकदिवसीय सामन्याची प्रेक्षकसंख्या घटत चालली आहे हे बोर्डाच्या लक्षात आलंच होतं पण पारंपरिक गोष्टींना एकदम बाजूला कसं सारणार? हा प्रश्न होताच.

टी-२० प्रकारचा निर्णय मतदानासाठी आला. एमसीसी अर्थात मेरलीबोन क्रिकेट क्लब ही संस्था क्रिकेटचे नियम तयार करते. त्यांना हे काही फारसं पटलं नव्हतं. पारंपरिक विचारसरणीच्या लोकांना हे गिमिक असल्यासारखं वाटलं.

टी-२० प्रकारामुळे खेळाचं पावित्र्य हरपेल असं काहींना वाटलं. काहींचा टी-२० प्रकाराला विरोध नव्हता पण निर्णय घेण्याची घाई होतेय असं काहींना वाटलं. बाजूचे-विरोधातले असे तट होते. रॉबर्टसन यांनी क्रिकेटच्या मूलभूत ढाच्यात कोणताही बदल होणार नसल्याचं स्पष्ट केलं.

खेळाचे नियम बदलणार नाहीत. षटके कमी होतील, त्या अनुषंगाने जे बदल करावे लागतील ते होतील पण खेळाचा गाभा कायम राहील असं त्यांनी स्पष्ट केलं. प्रेक्षकांना मैदानात आणायचं असेल तर कधी ना कधी हे पाऊल उचवावं लागेल हेही त्यांनी आवर्जून मांडलं.

आपण कदाचित मुहुर्तमेढ रोवू, जग आपल्याला फॉलो करेल. दुसरं कोणीतरी करण्याची वाट पाहत बसण्यापेक्षा आपण हा धाडसी पण व्यवहार्य निर्णय घ्यावा असं निवेदन रॉबर्टसन यांनी केलं. काऊंटी मेंबर्सच्या अनेक शंकांना उत्तरं दिली. चर्चा झाली.

अखेर मतदानाचा निर्णय टी-२०च्या बाजूने ११-७ असा लागला. निसटता विजय होता पण तेवढं पुरेसं होतं.

म्हणून आम्ही वाहवत गेलो अशी प्रांजळ कबुली रॉबर्टसन यांनी दिली आहे.

टी-२० प्रारुप डोमेस्टिक पातळीवर खपणीय ठरतं, मात्र आंतरराष्ट्रीय संघांमधल्या टी-२० सामने तेवढ्या लोकप्रिय होत नाहीत याचं कारण लोक त्या प्लेयर्सना सतत पाहत असतात. त्यांना वेगळं काहीतरी हवं असतं. डोमेस्टिक टी-२० स्पर्धा ते प्रेक्षकांना देतात म्हणून त्या लोकप्रिय आहेत असं रॉबर्टसन यांना वाटतं.

टी-२० प्रमाण मानून जगभरात असंख्य ठिकाणी लीग सुरू झाल्या आहेत. झटपट पैसे कमावण्याचं माध्यम म्हणून खेळाडू त्याकडे पाहतात. मात्र टी-२०चा जनक कोटीच्या कोटी भराऱ्यांपासून दूर आहे. मी यातून फार पैसे कमवू शकलो नाही मात्र खेळाला नवा आयाम देऊ शकलो याचं समाधान आहे असं रॉबर्टसन यांनी अनेक मुलाखतींमधून सांगितलं आहे.

अतिरेक झाला तर टी-२०चं नुकसान होऊ शकतं असा महत्त्वपूर्ण सल्लाही त्यांनी दिला आहे.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here