आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

रावळपिंडी एक्सप्रेसची ती एक रात्र शंकराच्या कृपेने तो कधीच विसरू शकणार नाही!


क्रिकेट विश्वात सगळ्यात जलद गोलंदाजी टाकणाऱ्या रावळपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तरसमोर भल्या भल्या दिग्गज खेळाडूंनी गुडघे टेकले, पण हाच रावळपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तर १ मार्चचा तो दिवस आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. योगायोगाने त्या दिवशी महाशिवरात्र होती. तब्बल १९ वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतल्या सेंच्युरियन मैदानातला तो दिवस शोएबसाठी त्याच्या करियरमधला काळा दिवस ठरला.

२००३ विश्वचषकामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातला तो सामना आजही भारतीय क्रिकेट रसिक विसरला नसेल. सामन्याआधी झालेल्या राष्ट्रगीताने खेळाडू, मैदानात उपस्थित असलेले प्रेक्षक आणि टीव्हीवर बघणारे कोट्यावधी चाहते रोमांचित झाले होते.

पाकिस्तानचा कर्णधार वकार युनूस याने या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला आणि ५० षटकामध्ये २७३/७ पर्यंत मजल मारली. ओपनर सईद अन्वरने १०१ धावांची खेळी केली, तर भारताकडून झहीर खान आणि आशिष नेहरा यांना प्रत्येकी २-२ गडी बाद केले. तर जवागल श्रीनाथ आणि दिनेश मोंगियाने १-१गडी बाद केले.

वसीम अक्रम, वकार युनूस, शोएब अख्तर, अब्दुल रझाक आणि शाहिद आफ्रिदी या गोलंदाजी आक्रमणाचा सामना करताना २७७ धावांचा पाठलाग करणं अजिबातच सोपं नव्हतं, पण सचिन तेंडुलकरने मात्र सेंच्युरियनच्या त्या मैदानात अक्षरश: तांडव केला. पहिल्या चेंडूपासूनच सचिनने त्याचा इरादा स्पष्ट केला. सचिन आणि सेहवागच्या ओपनिंग जोडीने ५.४ षटकामध्येच ५३ धावा केला. सचिनने रावळपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तरच्या उसळत्या चेंडूवर थर्ड मॅनच्या दिशेने मारलेला षटकार आजही चाहते विसरलेले नाहीत.

वीरेंद्र सेहवाग २१ धावांवर बाद झाल्यानंतर सौरव गांगुली पुढच्याच चेंडूवर शून्यवर माघारी परतला, पण मग सचिनने मोहम्मद कैफच्या जोडीने भारताचा डाव सावरला. ३५ धावांची खेळी करून कैफही बाद झाला, पण सचिन मात्र किल्ला लढवत होता, पण शतकाच्या जवळ पोहोचल्यानंतर सचिनला दुखापत झाली. असह्य वेदना होत असतानाही तो मैदान सोडून गेला नाही, अखेर शोएबच्याच उसळत्या चेंडूने घात केला आणि सचिन ९८ धावांवर बाद झाला. ७५ चेंडूमध्ये केलेल्या या खेळीमध्ये सचिनने १२ चौकार आणि एक षटकार मारली.

सचिनची बाद झाल्यानंतर राहुल द्रविड आणि युवराजच्या जोडीने शेवटपर्यंत लढत दिली आणि भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. युवराजने ५३ चेंडूमध्ये नाबाद ५० धावा केल्या, तर द्रविडनेही ४४ धावांची खेळी केली.

२००३च्या या विश्वचषकामध्ये भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचली, पण ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. सचिन तेंडुलकर या विश्वचषकामधला सर्वाधिक स्कोअर करणारा खेळाडू होता.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here