आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

क्रिकेट च्या इतिहासातील मागच्या पानातून पुढे जाताना लक्ष आता विराट कोहली!


विशेष गोष्ट म्हणजे, ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग हा जगातील एकमेव फलंदाज आहे, ज्याने त्याच्या १०० व्या कसोटीत २ शतके झळकावली आहेत. भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना ४ मार्च २०२२ पासून मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधील आपले स्थान सुधारण्यासाठी प्रयत्न करेल.

दुसरीकडे, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठीही हा सामना विशेष असणार आहे. कारण त्यालाही आपल्या शतकांचा दुष्काळ संपवायचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोहालीत उतरताच तो त्याचे कसोटी क्रिकेट शतकही पूर्ण करणार आहे. विराट कोहली १०० किंवा त्याहून अधिक कसोटी सामने खेळणारा भारताचा १२वा आणि एकूण ७०वा क्रिकेटपटू ठरणार आहे.

आणखी एक गोष्ट म्हणजे कोणत्याही भारतीय खेळाडूला करता आली नाही, अशी ऐतिहासिक कामगिरी करण्याची मोठी संधी विराटकडे आहे. जर कोहलीने १०० व्या कसोटी सामन्यात शतक झळकावले, तर तो नवा इतिहास रचेल. २०११ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यातून कोहलीने कसोटी पदार्पण केले होते. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सातव्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर पोहोचली होती.

आजपर्यंत एकाही भारतीय फलंदाजाला आपल्या १०० व्या कसोटी सामन्यात शतक झळकावता आलेले नाही. शंभराव्या कसोटीत शतक झळकावण्याबाबत बोलायचे झाले, तर आतापर्यंत फक्त ९ फलंदाजांना ही कामगिरी करता आली आहे. यापैकी तीन खेळाडू हे इंग्लंडचे आहेत. पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेचे प्रत्येकी २ फलंदाज आहेत. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजच्या प्रत्येकी एका फलंदाजानेही ही कामगिरी केली आहे. शंभरव्या कसोटीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम इंग्लंडच्या जो रूटच्या नावावर आहे. ५ फेब्रुवारी २०२१ रोजी चेन्नई येथे भारताविरुद्धच्या सामन्यात जो रूटने २१८ धावा केल्या होत्या.

१०० व्या कसोटी सामन्यात शतक झळकावणारे खेळाडू –

१) सर कॉलिन कॉड्रे (इंग्लंड)

२) जावेद मियाँदाद (पाकिस्तान)

३) गॉर्डन ग्रिनीज (वेस्ट इंडिज)

४) ऍलेक स्टुअर्ट (इंग्लंड)

५) इंझमाम-उल-हक (पाकिस्तान)

६) रिकी पॉंटिंग (ऑस्ट्रेलिया)

७) ग्रॅमी स्मिथ (दक्षिण आफ्रिका)

८) हाशिम आमला (दक्षिण आफ्रिका)

९) जो रूट (इंग्लंड)

आणखी एक गोष्ट म्हणजे कसोटीमध्ये ८००० धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी कोहलीला आणखी ३८ धावांची गरज आहे. असे झाल्यास कसोटीत ८००० किंवा त्याहून अधिक धावा काढणारा कोहली हा सहावा भारतीय खेळाडू ठरेल. या आधी असा पराक्रम सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, व्ही.व्ही.एस.लक्ष्मण, राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग यांनी केला आहे.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here