आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

२००३ वर्ल्डकप मध्ये होम ग्राउंडवर दक्षिण आफ्रिकेच्या बाऊचरच्या चुकलेल्या रणनीतीमुळे आफ्रिका पुन्हा ठरली चोकर्स!


२००३ चा वर्ल्डकप भारतीय चाहत्यांना फक्त दोनच करणांमुळं लक्षात आहे, सचिननं पाकिस्तानची केलेली धुलाई आणि रिकी पाँटिंगच्या बॅटमध्ये नसलेली स्प्रिंगनं हिरवलेला भारताचं स्वप्न. या वर्ल्डकपमध्ये तसं खळबळजनक काही झालं नाही. ऑस्ट्रेलियानं भारतासकट सगळ्या संघांचा पालापाचोळा केला होता. त्यावर्षी ऑस्ट्रेलियासोबतच वर्ल्डकपचे आणखी तीन दावेदार होते, भारत, श्रीलंका आणि यजमान दक्षिण आफ्रिका.

होम ग्राउंडवरची स्पर्धा, सुटेबल हवामान आणि खेळपट्ट्यांचा अनुभव पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तगडा संघ, अशा सगळ्या गोष्टींमुळे आफ्रिकन संघ यावेळी तरी वर्ल्डकप नेणार असं फिक्स वाटलं होतं. १९९९ च्या वर्ल्ड्कपला सेमीफायनलमध्ये एका रनआऊटमुळं त्याचं स्वप्न भंगलं. साहजिकच आपल्या मायदेशी वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न पूर्ण करायची त्यांना संधी होती. मध्ये एक अडथळा होता, करो या मरो असलेल्या लीग सामन्याचा. तारीख, ३ मार्च २००३, दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका.

आता या सामन्यामध्ये काय झालं, हे सांगण्याच्या आधी तुम्हाला आणखी काही गोष्टी सांगितल्या पाहिजेत. दक्षिण आफ्रिका आणि वर्ल्डकपची ट्रॉफी यांचं नातं म्हणजे समोर लोण्याचा गोळा पण मांजरीला बोक्याच्या समोर खाता येईना. हे काय प्रेम आहे का? तर आहे. लोण्याला मिळवायचा चान्स आहे का तर आहे. पण दरवेळी बोक्यामुळे बाजार उठतो..की शेवटी..’ अब साला मूड नाही.’ हेच डोक्यात येतं. १९९२ ला त्यांनी सेमीफायनल गाठली होती, त्यादिवशी पावसामुळे डकवर्थ लुईस नियम लागला आणि १ बॉलमध्ये २२ रन्स असं कुणालाच शक्य नसलेलं आव्हान त्यांना मिळालं.

आपण कट्टर आफ्रिकन फॅन्स नसलो, तरी त्यादिवशी त्यांच्यासाठी वाईट वाटलं. १९९६ मध्ये त्यांचे स्टार्स पुन्हा विनिंगमध्ये होते, पण क्वार्टर फायनलमध्ये ब्रायन लारा नावाचा एक भिडू त्यांची स्वप्न बेचिराख करून गेला. ९९च्या सेमीफायनलचा किस्सा तर इतका चघळलाय की आता तोंडपाठ झालाय.

सलग तीन वर्ल्डकप स्पर्धा आणि तिन्ही वेळेस आफ्रिकेची एकच अवस्था… अब साला मूड नही. २००३ मध्ये शॅान पोलॅाककडे आफ्रिकन संघाचं नेतृत्व होतं. ऑलराउंडर पोलॅाक चमत्कार घडवून आणेल अशी अगदी दाट शक्यता होती. लीग स्टेज मधला अखेरचा सामना, आफ्रिकेला फक्त जिंकायचं होतं… कुंदनला झोया मिळाली असती… डर्बनच्या घाटांवर.

अरविंदा डी सिल्व्हा आणि अट्टापट्टू या दोघांनी चौथ्या गड्यासाठी १५२ रन्सची पार्टनरशिप केली. मात्र दोन बोल्सच्या अंतरानं दोघही आउट झाले. दक्षिण आफ्रिकेत जरा आनंद पसरला. पुढं लंकेचा डाव कोसळला आणि २६८ वर त्यांच्या इनिंगला फुलस्टॅाप बसला. मग सुरु झाली आफ्रिकेची इनिंग. त्यांची सुरुवात भक्कम झाली, स्मिथनी ३५ आणि शुद्धीत असलेल्या गिब्सनं फिफ्टी मारत संघाच्या विजयाचे चान्सेस वाढवले होते. स्कोअर १४९ वर असताना गिब्स ७३ रन्स करून आउट झाला. पण पुढं शॅान पोलॅाक आणि मार्क बाऊचरनं बाप बॅटिंग करत डाव सावरला.

जयसूर्याला रनआउट करून आफ्रिकेला सामन्यामध्ये ठेवणारा पोलॅाक स्वत:ही रनआउट झाला. पण बाऊचरनं मात्र लय विषय बॅटिंग केली. पोलॅाक आउट झाला आणि मैदानात पावसाची ऐनवेळी हजेरी लावली. पाऊस इतका सणकून आला होता, की अंपायर भावांनी कोट-बीट घातले, स्टेडियममधले लोकांनी रेनकोट घातले. आफिकेला ५३ रन्स हवे होते. ती ओव्हर टाकायला आलं, लंकेचा सगळ्यात हुकमी एक्का… मुथय्या मुरलीधरन.

पावसाचा जोर वाढला होता, क्रिझवर बाऊचर आणि लान्स क्लूझनर म्हणजेच झुलू होता. आफ्रिकेचा स्कोअर होता २१६, पाऊस आलाय म्हणल्यावर हे फिक्स होतं. गणितानुसार आफ्रिकेला आपला रनरेट चांगला ठेवण्यासाठी २२९ च्या पुढं स्कोअर न्यायचा होता. थोडक्यात १४ रन्स हवे होते, पहिल्या बॉलला १ रन काढला. पुढचे दोन बॉल्स मुरलीचे झुलुला काही झेपले नाही. चोथ्या बॉलवर मुरली आणि संगकारा दोघंही गंडले आणि वाईड गेलेला बॉल सीमारेषेपलीकडे गेला. पुन्हा चौथा बॉल आणि पाचवा बॉल १-१ सिंगल. स्कोअर२२३. पाचव्या बॉलवर बाऊचरनं लय बाप सिक्स मारला आणि बाऊचरसकट सगळ ग्राउंड आनंदानं उसळलं. पण टोनी भाऊ ग्रेग समालोचनात सांगत होते की आता लास्ट बॉलला १ रन घ्यायला हवा आणि मगच आफ्रिका जिंकेल.

पण शेवटच्या बॉलवर बाऊचर पळालाच नाही, त्यानं रनचं घेतला नाही. यामागचं कारण होतं, किल त्याला वाटलं २२९ झाले म्हणजे आपण जिंकलो. त्यानं केलेलं गणित चुकलेलं, त्याचा अंदाज आफ्रिकेला लई महागात पडला होता. ज्यामुळे पोलॅाकची कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात आली. मायदेशात झालेल्या वर्ल्डकपमध्येच आफ्रिकन संघ ग्रुप स्टेजमधून बाहेर पडला. आणि अजूनही चोकर्सचा टॅग पुसला गेला नाही किंव्हा त्यांना तो पुसता आला नाही.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here