आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

आणि धोनीने पोलिसांना हाताशी धरून ट्रॅफिक जॅम करत चाहत्यांसह सुपर ओव्हर पाहिली!


आयपीएल २०२२ मेगा लिलावात खेळाडूंवर लाखो रुपयांचा वर्षाव झाला आणि आता लवकरच सर्व खेळाडू मैदानात खेळताना दिसणार आहेत. यंदा आयपीएलचा १५ हंगाम असून १० संघ सहभागी होत आहेत. त्यामुळे यंदाचा हंगाम अनेक कारणांनी हटके ठरणार आहे.

आयपीएल सर्व सामने मुंबई आणि पुण्यातील स्टेडियममध्ये खेळविले जाणार असून प्रेक्षकांनाही प्रवेश देण्यात येणार आहे. आयपीएलच्या नव्या हंगामाचा प्रोमोही रिलीज करण्यात आला असून नेहमीप्रमाणे त्यात धोनीचा हटके लूक पाहायला मिळत आहे. यावेळी धोनी बस ड्रायव्हरच्या भूमिकेत असून त्याचा लूक दक्षिण भारतीय दाखविण्यात आला आहे.

२६ मार्चपासून सुरू होणार्‍या आयपीएलची सर्व क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. यंदा १० संघ सहभागी होणार असल्याने स्पर्धा आणखी रंगतदार होणार आहे. या प्रोमोमध्ये धोनी बस चालवताना दिसत आहे. आणि अचानक तो रस्त्याच्या मधोमध ब्रेक लावतो आणि गाडी मागे घेण्यास सुरुवात करतो. यामुळे सगळीकडे ट्रॅफिक जॅम होते. ड्रायव्हिंग सीटवरून खाली उतरत धोनी बसच्या पायऱ्यांवर जाऊन बसतो.

तिथून जाणारे ट्रॅफिक पोलिस धोनीला बस का थांबविली आहे, असा प्रश्न विचारतात. तेव्हा आयपीएल सामन्यात सुरू असलेली सुपर ओव्हर पाहण्यासाठी बस थांबविल्याचे धोनी त्या ट्रॅफिक पोलिसांना सांगतो. ‘हे टाटा आयपीएल आहे, आणि हा वेडेपणा आता सामान्य झाला आहे,’ असं धोनी उत्तर देतोय.

IPL २०२२ मध्ये काय आहे खास?

आयपीएल यंदा वेगळ्या प्रकारामध्ये खेळविण्यात येणार आहे. १० संघांना दोन गटात विभागण्यात आले आहे. मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपरजायंट्स पहिल्या गटात आहेत, तर चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्ज, गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ दुसऱ्या गटात आहेत.

या नव्या प्रकारानुसार, लीग स्टेजमध्ये एक संघ ५ प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध २ सामने आणि ४ संघांविरुद्ध १ सामना खेळणार आहे. प्रत्येक संघ साखळी टप्प्यात एकूण १४ सामने खेळेल. त्यानंतर प्लेऑफसाठीचे संघ निश्चित होतील.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here