आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

भारतीय महिलांनी ऐतिहासिक कामगिरी करत पाकिस्तानवर मिळवला दणदणीत विजय! ‘या’ खेळाडू ठरल्या विजयाच्या शिल्पकार!


भारतीय महिला संघाने विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धची अपराजीत मालिका कायम राखली. महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारतीय महिलांनी सांघिक कामगिरी करताना पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताची अवस्था ६ बाद ११४ अशी दयनीय केली होती, परंतु पूजा वस्त्राकर व स्नेह राणा यांनी विश्वविक्रमी भागादारी करून पाकिस्तानसमोर तगडं आव्हान उभं केलं. त्यानंतर गोलंदाजीत राजेश्वरी गायकवाड, झुलन गोस्वामी, स्नेह व दीप्ती यांनी कमाल दाखवत पाकिस्तानचा दारूण पराभव केला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचा हा पाकिस्तानवरील सलग ११ वा विजय आहे.

तिसऱ्या षटकात पहिला धक्का बसल्यानंतर स्मृती मानधना व दीप्ती शर्मा यांच्या ९२ धावांच्या भागीदारीने भारतीय संघाला कमबॅक करून दिले होते. दीप्ती ४० धावांवर माघारी परतली. त्यानंतर स्मृती ७५ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह ५२ धावांवर बाद झाली. १ बाद ९६ अशा मजबूत स्थितीत असणाऱ्या भारताची अवस्था ६ बाद ११४ अशी झाली. हरमनप्रीत कौर ( ५), कर्णधार मिताली ( ९) व रिचा घोष ( १) यांचे अपयश भारताला महागात पडताना दिसत होते. पण, पूजा वस्त्राकर आणि स्हेन राणा यांनी सामनाच फिरवला. या दोघींनी ७व्या विकेटसाठी ९७ चेंडूंत १२२ धावांची भागीदारी केली. महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील ही ७व्या विकेटसाठीची सर्वोत्तम भागीदारी ठरली. पूजा ५९ चेंडूंत ८ चौकारांसह ६७ धावांवर बाद झाली. भारताने ७ बाद २४४ धावा उभ्या केल्या. स्नेह ४८ चेंडूंत ५३ धावांवर नाबाद राहिली.

प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या सिद्रा अमीन व जवेरीया खान यांनी सावध सुरुवात केली. या दोघांनी ११ षटकांत केवळ २८ धावा केल्या. राजेश्वरी गायकवाडने पाकिस्तानला पहिला धक्का देताना खानला ( ११) बाद केले. भारतीय गोलंदाज टिच्चून मारा करताना धावांवर चाप लावून ठेवताना दिसले. त्यामुळे पाकिस्तानी खेळाडूंवरील दडपणही वाढताना दिसले. दीप्ती शर्मा व स्नेह राणा यांनी अनुक्रमे कर्णधार बिश्माह मरूफ ( १५) व ओमाइमा सोहैल ( ५) यांची विकेट घेतली. अमीन एका बाजूने संघर्ष करत होती. पण, भारताची अनुभवी गोलंदाज ३४ वर्षीय झुलन गोस्वामीने तिला बाद केले. झुलनने अमीन ( ३०) व निदा दार ( ४) यांना माघारी पाठवून पाकिस्तानची अवस्था ५ बाद ७० अशी केली.

त्यानंतर राजेश्वरी गायकवाडने सहावी विकेट घेताना आलिया रियाझला ( ११) यष्टिचीत केले. गायकवाडने सातत्यपूर्ण कामगिरी केली. गायकवाडने ३१ धावांत ४ विकेट्स घेतल्या. झुलनने २६ धावांत २ विकेट्स घेतल्या. पाकिस्तानचा संपूर्ण संघ १३७ धावांवर तंबूत पाठवून भारताने १०७ धावांनी विजय मिळवला. पूजा वस्त्राकर ला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here