आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब
===
भारतीय संघाने दाखवून दिले की आम्ही फ्लॉवर नाही फायर आहे; तीन दिवसातच श्रीलंकेचा गाशा गुंडाळला
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात मोहालीच्या पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमवर २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पार पडला. आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत हा सामना खेळवला गेला. यजमान भारतीय संघाने तिसऱ्याच दिवशी पाहुण्या श्रीलंकेवर १ डाव आणि २२२ धावांनी विजय मिळवला आहे आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारताच्या ५७५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात १७४ धावांवरच गारद झाला. परिणामी भारताने श्रीलंकेला फॉलोवॉन दिला. मात्र श्रीलंकेचा संघ दुसऱ्या डावातही १७८ धावाच करूच शकला.रविंद्र जडेजाला मोहालीमध्ये सलग तिसऱ्यांदा सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
Huge victory!
India win by an innings and 222 runs to take a 1-0 series lead against Sri Lanka 🎉#WTC23 | #INDvSL | https://t.co/mo5BSRmFq2 pic.twitter.com/76hsYd9yKF
— ICC (@ICC) March 6, 2022
असा झाला भारत वि. श्रीलंका सामना
भारत आणि श्रीलंकेतील पहिल्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी निवडली होती. भारताकडून पहिल्या डावात अष्टपैलू रविंद्र जडेजा याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत २२८ चेंडूत ३ षटकार आणि १७ चौकारांच्या मदतीने नाबाद १७५ धावा चोपल्या. त्याच्या साथीला अष्टपैलू आर अश्विननेही खालच्या फळीत तुफानी ६१ धावांची अर्धशतकी खेळी केली.
तत्पूर्वी डावाच्या सुरुवातीला मधल्या फळीत यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याने ९६ धावा फटकावल्या. तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या हनुमा विहारीनेही ५८ धावांनी संथ खेळी केली. भारतीय संघाने ५७४ धावांवर डाव घोषित केला.
भारताच्या भल्यामोठ्या ५७५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाला २०० धावाही करता आल्या नाहीत. फिरकी अष्टपैलू जडेजाने फलंदाजीनंतर गोलंदाजीतही दम दाखवत श्रीलंकेला कमी धावांवर रोखले. त्याने श्रीलंकेच्या पहिल्या डावात १३ षटके गोलंदाजी करताना ४१ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. तसेच जसप्रीत बुमराह आणि आर अश्विनने प्रत्येकी २ विकेट्सचे योगदान दिले. या डावात श्रीलंकेकडून एकटा पथुम निसांका अर्धशतक करू शकला. तो ६१ धावांवर नाबाद राहिला. अशाप्रकारे ६५ षटकांमध्ये १७४ धावांवर सर्वबाद झालेल्या श्रीलंकन संघाला भारताने फॉलोअप दिला.
दुसऱ्या डावात श्रीलंकेकडून यष्टीरक्षक निरोशन डिकवेलाने एकाकी झुंज दिली. परंतु तो संघाचा पराभव टाळू शकला नाही. तो दुसऱ्या डावात ८१ चेंडूंमध्ये ९ चौकारांच्या मदतीने ५१ धावा करत नाबाद राहिला. या डावात भारताकडून फिरकीपटू आर अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या. हा रोहित शर्माचा भारताचा कसोटी कर्णधार म्हणून पहिला विजय होता. यानंतर उभय संघातील दुसरा आणि शेवटचा सामना १२ ते १६ मार्चदरम्यान बंगळुरू येथे होणार आहे.
==
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.