आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब
===
विराटचा ‘मटण रोल’, मागे लागलेली अनोळखी लोकं आणि त्यामागचा हा मजेशीर किस्सा!
विराट कोहली हा फिटनेसच्या बाबतीत खूप जागरूक आहे. त्याच्या फिटनेसमुळे फक्त क्रिकेटच नाही तर सर्वच स्तरातील लोकांसाठी तो आदर्श आहे. विराटच्या खाण्यापिण्याच्या सवयी अगदीच मोजक्या आहेत. तो तंदुरूस्त राहण्यासाठी अनेक पथ्य पाळतो.
पण अंडर १९ संघात असताना मात्र विराट तसा नव्हता. भारतीय संघाकडून विराट सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत गेला असताना मटण रोल खाण्यासाठी त्याने अक्षरश: जीवाची बाजी लावली होती. नुकताच त्याच्याबद्दलचा हा धमाल किस्सा चाहत्यांना समजला.
विराट कोहली आणि दिल्लीचा वेगवान डावखुरा गोलंदाज प्रदीप सांगवान हे दोघे खास मित्र होते. सांगवानने विराटबद्दलची त्यावेळची आठवण सांगितली. ‘विराट हा अंडर १९ क्रिकेट खेळताना फिटनेसच्या बाबतीत तितका गंभीर नव्हता. त्याला खायला खूप आवडत असे. विशेषत: स्ट्रीट फूड (रस्त्यावर विकले जाणारे खाद्यपदार्थ) त्याला फारच पसंत होतं. आम्ही आफ्रिका दौऱ्यावर रूम पार्टनर होतो. त्यावेळी विराटला कोणीतरी सांगितलं की आफ्रिकेतील एका ठिकाणी मटण रोल खूप छान मिळतात, पण ती जागा फारशी सुरक्षित नाही.’
‘विराट हा खवय्या होता. त्यामुळे त्याला मटण रोल खायचेच होते. त्याने मला सांगितलं की आपण तिथे खायला जाऊया. मी आधी तयार झालो. पण जेव्हा आम्ही आमच्या ड्रायव्हरला त्या ठिकाणी घेऊन जायला सांगितलं त्यावेळी ड्रायव्हरही आम्हाला म्हणाला की ते ठिकाण सुरक्षित नाही.
तिथे काही दिवस आधी फार मोठा राडा झाला होता. पण तरीही विराटच्या हट्टापायी आम्ही तिथे गेलोच. तिथे मटण रोल खाताना आमच्यामागे काही अनोळखी लोकं लागली. पण आम्ही कसेबसे तेथून पळून गेलो आणि गाडी थेट हॉटेलमध्ये आल्यावरच थांबवली’, असा किस्सा त्याने सांगितला.
==
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.