आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

शरद पवार बीसीसीआयचे अध्यक्षपद असताना भारतीय क्रिकेटचे भविष्य बदलले, या माजी पदाधिकाऱ्याचे मोठे वक्तव्य!


भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी असताना शरद पवार यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते. त्यांच्या निर्णयांचा भारतीय क्रिकेटला आजही फायदा होत आहे, असे मत ‘बीसीसीआय’चे माजी पदाधिकारी प्राध्यापक रत्नाकर शेट्टी यांनी व्यक्त केले.

‘‘शरद पवार ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष असताना भारतात महिला क्रिकेटला चालना मिळाली. २००८मध्ये इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटला सुरुवात झाली, त्यावेळी तेच ‘बीसीसीआय’च्या अध्यक्षपदी होते. त्यांच्या कार्यकाळातच माजी क्रिकेटपटूंसाठी निवृत्तीवेतनची सेवा सुरू करण्यात आली. त्यामुळे भारतीय क्रिकेटच्या प्रगतीत पवार यांचे महत्त्वाचे योगदान आहे,’’ असे शेट्टी म्हणाले.

रसायनशास्त्राचे प्राध्यापक असलेल्या शेट्टी यांच्या ‘ऑन बोर्ड – माय इयर्स इन बीसीसीआय’ या पुस्तकाचे मंगळवारी पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, मुंबई क्रिकेट संघटनेचे (एमसीए) अध्यक्ष डॉ. विजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पवार आणि वेंगसरकर यांनी शेट्टी यांची स्तुती केली. ‘‘मी ‘बीसीसीआय’नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचे (आयसीसी) अध्यक्षपद भूषवले. त्यावेळी मी शेट्टी यांनाही ‘आयसीसी’मध्ये येण्याबाबत विचारणा केली होती. मात्र, त्यांनी ‘बीसीसीआय’ आणि ‘एमसीए’साठी कार्यरत राहण्याला प्राधान्य दिले,’’ अशी आठवण यावेळी पवार यांनी सांगितली. पवार हे २००५ ते २००८ या कालावधीत ‘बीसीसीआय’च्या अध्यक्षपदी होते. तर शेट्टी यांची २००६ मध्ये ‘बीसीसीआय’चे पहिले मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमणूक झाली होती.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here