द्रौपदी मुर्मू यांच्या रूपाने देशाला पहिला आदिवासी राष्ट्रपती मिळालाय..
संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांनी बाजी मारली आहे. त्यांनी विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला आहे. द्रौपदी मुर्मू यांना 812 मतं तर यशवंत सिन्हा यांना 521 मतं मिळाली आहेत.
राष्ट्रपतीपदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या आदिवासी महिला असतील. द्रौपदी मुर्मू या 24 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील. देशाचे सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाल 24 जुलै रोजी समाप्त होणार आहे.
मतमोजणीच्या पहिल्या फेरीत एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांना 540 मतं मिळाली होती. या मताचे मूल्य 3,78,000 इतकं होतं. तर विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना 208 मतं मिळाली होती, त्यांच्या मताचे मूल्य हे 1,45,600 इतकं होतं. दुसऱ्या फेरीत द्रौपदी मुर्मू यांना 1349 मतं मिळाली तर यशवंत सिन्हा यांना 537 मतं मिळाली. सर्व राज्यांतील मतमोजणी झाल्यानंतर अखेर मुर्मू यांना 5 लाख 77 हजार 777 इतकी मतं मिळाली.
हेही वाचा: देशातील सर्वांत मोठ शिवमंदिर आपल्या औरंगाबाद जिल्ह्यात बांधलं जातंय..
कोण आहेत द्रौपदी मुर्मू?
द्रौपदी मुर्मू या ओडिशातील आदिवासी नेत्या आहेत. ओडिशातील BJP-BJD युती सरकारमध्ये 2002 ते 2004 या काळात त्या मंत्री होत्या. त्यांनी झारखंडच्या नवव्या राज्यपाल म्हणून देखील काम केलं आहे. द्रौपदी मुर्मू या ओदिशाच्या रायरंगपुर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या.
द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल माहिती
-ओडिशाच्या आदिवासी कुटुंबात 20 जून 1958 रोजी जन्म.
-सुरुवातीला शिक्षिका म्हणून नोकरी, त्यानंतर राजकारणात प्रवेश.
-1997 मध्ये राइरंगपूर नगर पंचायतीत नगरसेवक म्हणून विजयी.
-2000 ते 2009 ओडिशा विधानसभेत आमदार, 2000 ते 2004 या काळात कॅबिनेट मंत्री.
-2015 मध्ये झारखंडच्या राज्यपाल म्हणून नियुक्ती.
देशात आतापर्यंत आदिवासी समुदायातील कोणीही व्यक्ती राष्ट्रपती बनलेला नाही. महिला, दलित, मुस्लीम आणि दक्षिण भारतातील व्यक्ती राष्ट्रपतीपदी विराजमान झाले आहेत. पण आदिवासी समाज यापासून वंचित राहिला होता. त्यामुळे आदिवासी समाजातील व्यक्तीला राष्ट्रपती होण्याचा बहुमान मिळावी अशी मागणी केली जात होती. आता द्रौपदी मुर्मू यांच्या माध्यमातून ही गोष्ट साध्य झाली आहे.
आणखी एक विशेष योगायोग म्हणजे आजच्याच दिवशी भारताला पहिल्या महिल्या राष्ट्रपतीही मिळाल्या होत्या. 15 वर्षापूर्वी 21 जुलै रोजी देशाला प्रतिभा पाटील यांच्या रुपाने पहिल्या महिला राष्ट्रपती मिळाल्या होत्या. 21 जुलै 2007 रोजी झालेल्या मतमोजणीत प्रतिभा पाटील यांचा विजय झाला होता. त्यांनी 25 जुलै 2007 रोजी पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. त्या देशाच्या 12 व्या राष्ट्रपती होत्या. 2007 ते 2012 या कालावधीत त्यांनी देशाचं सर्वोच्च पद भूषवलं. त्यानंतर आता द्रौपदी मुर्मू यांनी निवडणुकीत बाजी मारली आहे.
हेही वाचा:
देशातील सर्वांत मोठ शिवमंदिर आपल्या औरंगाबाद जिल्ह्यात बांधलं जातंय..
हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..