हिंदूंकडन कर घेऊन बनवण्यात आलेली ही ‘तोफ’ पानिपत युद्धात हिंदुंवरचं भारी पडली…
पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला. या युद्धात मराठ्यांना ज्या तोफांनी लक्ष्य करण्यात आलं त्या तोफांचीही एक रंजक कहाणी आहे. लाहोरमधल्या हिंदूकडून जिझिया कराच्या रुपात तांबे-पितळेची भांडी घेऊन त्यापासून या तोफा बनवण्यात आल्या होत्या. निम्म्याहून अधिक अठरावं शतकं सरलं होतं. अफगाण शासक अहमद शाह अब्दालीने एकापाठोपाठ एक आक्रमण करून पंजाबमधील ढासळलेली मुघल राजवट उलथवून टाकली होती. पण, काही शत्रू अजून शिल्लक होते.
याच काळात दोन नवीन तोफा बनवण्याचे आदेश काढण्यात आले. पण, तोफ बनवण्यासाठी लागणारा धातू कमी पडला.
अभ्यासक मजीद शेख लिहितात, “लाहोरमधल्या हिंदूंनी जिझिया कर द्यावा, असे आदेश देण्यात आले होते. लाहोरचे सूभेदार शाह वली खानचे शिपायी प्रत्येक हिंदू घरातून तांबी किंवा पितळेची सर्वात मोठी भांडी गोळा करायचे. जेव्हा पुरेशी भांडी जमली तेव्हा लाहोरमधल्याच शाह नझीर नावाच्या एका कारागिराने ही भांडी वितळून तोफा बनवल्या.”
तोफा तयार झाल्यावर त्यांना ‘झमझमा’ नाव देण्यात आलं. या तोफा पहिल्यांदा धडधडल्या त्या मराठ्यांविरुद्ध पानिपतच्या तिसऱ्या युद्धात. दिवस होता 14 जानेवारी 1761.
पानिपतच्या तिसऱ्या युद्धात एक लाखाहून जास्त सैनिक मारले गेल्याचा दावा जेजी डफ यांनी ‘हिस्ट्री ऑफ मराठा’ या पुस्तकात केला आहे. इतकंच नाही तर यापैकी “40 हजार सैनिकांना युद्धानंतर दोन मोठ्या तोफेच्या तोंडी देण्यात आल्याचं” पुस्तकात नमूद करण्यात आलं आहे.
या ‘विजया’नंतर अमहद शाह अब्दाली लाहोरमार्गे काबूलला परतला. दोन्ही तोफादेखील सोबत घेऊन जाण्याची त्याची मनिषा होती. मात्र, त्यांना एकच नेता आली आणि तीही प्रवासात चिनाब नदीत बुडाली.
मराठ्यांचं पानिपत करणाऱ्या दुसऱ्या तोफेने मात्र पुढे बरंच काही बघितलं. लाहोरचे नवे सुभेदार ख्वाजा उबैद यांच्या देखरेखीखाली ती लाहोरलाच ठेवण्यात आली.
1707 साली औरंगजेबाच्या मृत्यूनंतर खिळखिळ्या झालेल्या मुघल राजवटीला एकीकडे अफगाण आणि इराणी आक्रमकांनी हैराण केलं तर दुसरीकडे पंजाबच्या ग्रामीण भागात शिखांनी या कमकुवत राजवटीचा फायदा घेत छोट्या-छोट्या टोळ्या बनवल्या.
1716 साली स्थापन झालेल्या एका गटाचं नाव होतं भंगिया. भांगेचं व्यसन असल्याने या गटाचं नाव भंगिया ठेवण्यात आलं होतं.
भांगेच्या सरबतामुळे त्यांना एक वेगळीच झिंग चढायची आणि त्यामुळे निडर होऊन ते लढाईत उतरायचे, असं सांगितलं जातं. या शक्तिशाली गटाचे संस्थापक जाट समाजातून येणारे छज्जा सिंह (छज्जू सिंह) होते. अमृतसरपासून 24 किमी अंतरावर असलेलं पंजवार हे त्यांचं गाव.
छज्जा सिंग यांनी दहावे गुरू गोविंद सिंह यांच्याकडून अमृतप्राशन करत शीख धर्माची दीक्षा घेतली होती, असं कन्हैय्या कुमार यांनी ‘हिस्ट्री ऑफ पंजाब’ या पुस्तकात लिहिलं आहे.
एक दिवस आपण पंजाबवर राज्य करू, या गुरूंच्या भविष्यवाणीचा दाखला देऊन ते आपल्या समर्थकांचं मनोधैर्य वाढवत. या भविष्यवाणीवर असलेल्या दृढ विश्वासाच्या बळावरच त्यांनी पंजाबमध्ये मुघल राजवटीविरोधातल्या कारवायांमध्ये सहभाग घेतला. या गटाकडे शस्त्रास्त्रं कमी होती. त्यामुळे त्यांचा भर गोरिल्ला युद्धकलेवर अधिक असायचा.
शीख धर्मातले अनेक जण या गटात सहभागी झाल्याचं सैय्यद मोहम्मद लतिफ यांनी ‘हिस्ट्री ऑफ द पंजाब’ या पुस्तकात नमूद केलं आहे. या गटातल्या सशस्त्र सैनिकांनी रात्रीच्या वेळी गुप्तहेर आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या गावांवर हल्ले करायला सुरुवात केली आणि ज्यांना जे सापडायचे ते पळवून आणायचे.
छज्जा सिंह यांच्या मृत्यूनंतर भीमा सिंह (भूमा सिंह) नावाच्या त्यांच्या एका साथीदाराने गटाचं नेतृत्त्व केल्याचं सांगितलं जातं. ते मोगाजवळच्या वेंडी परगनामधल्या हंग गावातल्या ढिल्लो या जाट समाजातले होते.
भंगी गटासह इतरही शीख गटांचं क्षेत्र वाढल्यावर त्यांना ‘मिसल’ संबोधलं गेलं.
इतिहासकार लेपल ग्राफिन आणि सैय्यद मोहम्मद लतीफ यांच्या मते भीमा सिंह कसूरचे रहिवासी होते आणि त्यांना शिखांच्या एकूण 12 मिसलांपैकी सर्वात प्रसिद्ध आणि शक्तीशाली मिसल असलेल्या भंगी मिसलचे सच्चे संस्थापक मानलं जाई.
भीमा सिंह यांनी 1739 साली नादिर शाह या इराणी शासकाच्या सैन्याशी संघर्ष केला आणि या संघर्षानंतर त्यांच्या नावाची कीर्ती सर्वदूर पसरली. भीमा सिंह यांच्या प्रशासकीय कौशल्यामुळे त्यांच्या मिसलची ताकद वाढली. 1746 साली त्यांचा मृत्यू झाला. भीमा सिंह यांना स्वतःचं अपत्य नव्हतं. त्यामुळे त्यांचे पुतणे हरी सिंह त्यांचे उत्तराधिकारी बनले.
पूर्वी या मिसलचे लोक रात्रीच्या अंधारातच लूट करायचे. मात्र, पुढे त्यांनी दिवसाढवळ्यासुद्धा लूट सुरू केली. हरी सिंह आपल्या साथीदारांसोबत शेकडो मैल दूरवर जात लूट करायचे आणि सगळं उद्धवस्त करून परतायचे.
हरी सिंह यांनी लाहोर आणि झमझमावर कब्जा केला. हरी सिंह यांनीच या तोफेचं नाव बदलून ‘भंगिया दी तोप’ (भंगियांची तोफ) ठेवलं. लहना सिंह, गुज्जर सिंह आणि कहानिया मिसलचे शोभा सिंह यांनी अहमद शाह अब्दालीच्या अफगाण सैन्यासोबत एका प्रदिर्घ गोरिल्ला युद्धानंतर 16 एप्रिल 1765 साली लाहोर ताब्यात घेतलं.
ते 20-20 घोडेस्वारांच्या टोळ्या बनवून हल्ला करत आणि मग पळून जात. संपूर्ण दोन महिने अजिबात खंड न पडू देता ही कारवाई सुरू होती.
लाहोर किल्ल्यावर चढाई करणं, एक धाडसी पाऊल होतं. रात्रीच्या अंधारात गुज्जर सिंहचे सैनिक काळे कपडे घालून चहुबाजूंने उभ्या भितींवरून एकसाथ चढून आत घुसले आणि तिथे असलेल्या सर्वांना मारून टाकलं. त्यानंतर मुख्य द्वार उघडून लहना सिंग आणि त्यांचे साथीदार किल्ल्याच्या आत गेले.
या कारवाईनंतर गुज्जर सिंह आपल्या सैन्यासोबत पंजाबच्या अधिकाधिक प्रांतांवर चढाई करण्यासाठी रवाना झाले. मोहिमांवर जाताना हे सैनिक फुटाणे, बेदाणे आणि चामड्याच्या पिशवीत पाणी इतकंच सामान सोबत ठेवत.
चौथे गुरू राम दास यांचा जन्म लाहोरमधल्या चुना मंडीत झाला होता. त्यामुळे लाहोर ‘गुरू का गहवारा’ (गुरूंची जन्मभूमी) असल्याचं सांगत त्यांनी लोकांना एकत्र करायला सुरुवात केली.
हीच शीख युगाची सुरुवात होती.
आपल्या 30 वर्षांच्या राजवटीत या तिन्ही राज्यकर्त्यांनी लाहोरला तीन प्रांतात विभागलं. लहना सिंग यांनी लाहोरचा किल्ला आणि आतल्या शहरावर राज्य केलं. गुज्जर सिंह भंगीने लाहोरच्या शालीमार बागेपर्यंतचा पूर्वेकडचा प्रांत सांभाळला. तर शोभा सिंह यांनी नियाज बेगपर्यंत पश्चिमेकडचा भाग सांभाळला.
गुज्जर सिंह यांनी एक नवीन किल्ला बांधला. हा किल्ला आजही ‘किला गुज्जर सिंह’ नावाने ओळखला जातो. शोभा सिंहने बाग-ए-जैबुन्नीसामध्ये किल्ला बांधला.
1766 साली अब्दाली परतला आणि 22 डिसेंबर रोजी लाहोरमध्ये दाखल झाला. अब्दाली दाखल होताच शीख राज्यकर्ते तिथून निघून गेले. अहमद शाह अब्दालीने लहना सिंह यांच्याकडे सुक्या मेव्याची टोपली पाठवत मैत्रीचा हात पुढे केला.
मात्र, लहना सिंहने फुटाण्याच्या टोपलीसह अब्दालीची भेट परत पाठवली. याचा स्पष्ट अर्थ होता दोघांमध्ये मैत्री होऊ शकत नाही.
अब्दालीची झमझमा तोफ लहना सिंग आणि गुज्जर सिंह यांच्या ताब्यात होती. मात्र, स्कारचकिया मिसल प्रमुख चढत सिंह यांनी लाहोरमध्ये केलेल्या लुटीत तोफ आपल्या वाट्यात आल्याचं म्हटलं होतं. चढत सिंह यांनी लाहोरवर चढाई करण्यात भंगी गटाची मदत केली होती.
चढत सिंह यांनी दोन हजार सैनिकांच्या मदतीने ती तोफ गुजराणवालाला पोहोचवली.
यानंतरच काही वर्षातच अहमदनगरच्या चठ्ठ्यांनी स्कारचकिया प्रमुखांकडून ती तोफ हस्तगत केली. अहमद खान आणि पीर मोहम्मद खान या दोन चठ्ठा भावांमध्येच या तोफेच्या मालकीवरून वाद झाला. त्या संघर्षात अहमद खानची दोन मुलं आणि पीर मोहम्मद खान यांचा एक मुलगा ठार झाला. या संघर्षात गुज्जर सिंह भंगी यांनी पीर मोहम्मद खान यांची मदत केली होती. पुढे त्यांनीच ती तोफ गुजरातला नेली.
1772 साली चठ्ठ्यांनी तोफ पुन्हा मिळवली आणि ती रसूल नगरला घेऊन गेले.
दुसरीकडे हरी सिंह यांच्या मृत्यूनंतर महान सिंह यांची सरदार म्हणून निवड झाली. महान सिंह यांच्या मृत्यूनंतर हरी सिंह यांची मुलं झंडा सिंह आणि गंडा सिंह शीख जनतेच्या पाठिंब्याने मिसल प्रमुख बनले.
1773 साली झंडा सिंह ती तोफ अमृतसरला घेऊन गेले. जम्मूवर केलेल्या हल्ल्यात झंडा सिंह यांचा मृत्यू झाला. त्यांनाही अपत्य नव्हतं.
गंडा सिंह यांनी पठाणकोटवर हल्ला चढवला. मात्र, हकीकत सिंह यांनी त्यांना लढाईत ठार केलं. त्यांचा मुलगा गुलाब सिंह याचं वय कमी असल्याने त्याला मिसल प्रमुख बनता आलं नाही. त्यामुळे गंडा सिंह यांचे धाकटे बंधू देसो सिंह यांना प्रमुखपदी बसवण्यात आलं.
त्याच्या पश्चात गंडा सिंह यांचा मुलगा गुलाब सिंह यांनी मिसल प्रमुखपदाची धुरा सांभाळली. गुलाब सिंह यांच्या राजवटीतच महाराजा रणजीत सिंह यांनी लाहोरवर कब्जा केला.
महाराजा रणजीत सिंह लाहोर शहराच्या भिंतीबाहेर आपलं सैन्य घेऊन उभे ठाकले त्यावेळी लहना सिंह, गुज्जर सिंह आणि शोभा सिंह या तिघांचाही मृत्यू झाला होता आणि त्यांची जागी त्यांची तीन मुलं चैत सिंह, मेहेर सिंह आणि साहब सिंह यांनी घेतली होती. पण, ही तिन्ही मुलं आपल्या वडिलांसारखे शूर नव्हते. दुबळ्या नेतृत्त्वाच्या अस्ताची वेळ येऊन ठेपली होती.
गुलाब सिंह आणि रणजीत सिंह यांचं सैन्य बेसिनच्या भागात समोरा-समोर उभं ठाकलं. दुसऱ्या दिवशी युद्ध सुरू होणार होतं. मात्र, त्या रात्री गुलाब सिंह यांनी एवढी दारू प्यायली की दुसऱ्या दिवशी ते झोपूनच होते आणि सैन्याला नेतृत्त्वच नसल्याने सगळं सैन्य विखुरलं.
त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा गुरुदत्त सिंह भंगी मिसल प्रमुखपदी विराजमान झाले. त्यांनी रणजीत सिंह यांच्यावर हल्ल्याची योजना आखली. मात्र, रणजीत सिंह यांना या योजनेचा सुगावा लागला आणि त्यांनीच लाहोरवर हल्ला करून गुरुदत्त यांना शहराबाहेर हाकलून स्वतः लाहोर ताब्यात घेतलं.
उदरनिर्वाहासाठी त्यांना काही गावं देण्यात आली. मात्र, कालांतराने ती गावंही त्यांच्याकडून परत घेण्यात आली. गुलाब सिंह यांच्या मृत्यूनंतर या मिसलमध्ये त्यांच्याएवढं सक्षम नेतृत्त्व उभंच झालं नाही आणि अशाप्रकारे या मिसलचा शेवट झाला.
1802 साली महाराजा रणजीत सिंह यांनी अमृतसरवर कब्जा केला. त्यावेळी तोफ त्यांना मिळाली. रणजीत सिंह यांच्या कार्यकाळातील इतिहासकार विशेषतः सोहन लाल सुरी आणि बुटे शाह लिहितात की भंगियांनी कान्ही आणि राम गढ मिसल यांच्या विरोधात दीना नगरच्या लढाईत ही तोफ वापरली होती. रणजीत सिंह यांनी डस्का, कसूर, सुजानपूर, वजीराबाद आणि मुल्तानच्या मोहिमांमध्ये ही तोफ वापरली.
या मोहिमांमध्ये तोफेचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे तोफ पुढच्या मोहिमांसाठी उपयोगी नसल्याचं सांगण्यात आलं आणि ती पुन्हा लाहोरला परतली. लाहोरमधल्या दिल्लीगेटच्या बाहेर ती स्थानापन्न झाली. 1860 सालापर्यंत ती तिथेच होती.
1864 साली मौलवी नूर अहमद चिश्ती ‘तहकीक-ए-चिश्ती’ लिहीत असताना त्यांना ही तोफ लाहोर संग्रहालयाच्या मागच्या बाजूला असलेल्या वजीर खानच्या बागेजवळ आढळली. 1870 साली लाहोर संग्रहालयाच्या गेटच्या रुपाने तोफेला नवं ठिकाण मिळालं.
ब्रिटिश राजवटीत ही तोफ आधी दिल्ली गेट आणि नंतर लाहोर संग्रहालयासमोर ठेवण्यात आली होती. अनारकली बाजाराजवळ संगमरवराच्या चौथऱ्यावर बांधलेल्या 265 वर्ष जुन्या या तोफेला ‘किम्ज गन’ असंही म्हटलं गेलं. ब्रिटिश लेखक रुडयार्ड किपलिंग यांच्या ‘किम’ या कादंबरीवरून हे नाव देण्यात आलं होतं.
या कादंबरीच्या सुरुवातीच्या ओळी आहेत, “पालिकेच्या आदेशांचं उल्लंघन करत किम एका जुन्या संग्रहालयाच्या समोर ठेवलेल्या तोफेवर बसला होता.”
कदाचित कडक उन्हामुळे असेल आम्ही मोडकळीला आलेल्या गुज्जर सिंह यांच्या किल्ल्याचा फोटो काढत असताना काही स्थानिकांनी विरोध केला. किल्ल्याच्या अवशेषांचे फोटो काढण्याची परवानगी तुमच्याकडे आहे का, अशी विचारणा ते करू लागले. काही पडक्या खिडक्या असलेली भिंत आणि दरवाजा दर्शवणारी कमान… किल्ल्याचे एवढेच अवशेष आता शिल्लक आहेत.
किल्ल्यावर अतिक्रमण करताना हे स्थानिक कुणाची परवानगी घेत असावे?
साडे नऊ इंच तोंड असलेल्या या 14 फूट लांब तोफेला स्थानिक आजही ‘भंगियांची तोफ’ असंच म्हणतात. मराठ्यांचं पानिपत करण्यासाठी तयार करण्यात आलेली ही तोफ आजही पानीपतच्या दिशेने तोंड करून उभी आहे. पण, तिचा रक्तपात आता थांबला आहे.
हेही वाचा:
देशातील सर्वांत मोठ शिवमंदिर आपल्या औरंगाबाद जिल्ह्यात बांधलं जातंय..
हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..