ब्रिटिशांकित हिंदुस्थानातलं एक जुनं संस्थान असलेल्या जव्हारचा इतिहासही तेवढाच रंजक आहे..

By | July 5, 2022

ब्रिटिशांकित हिंदुस्थानातलं एक जुनं संस्थान असलेल्या जव्हारचा इतिहासही तेवढाच रंजक आहे..


जव्हार वैभवशाली आणि गौरवशाली परंपरा असलेला तालुका प्रभू श्रीरामांच्या वास्तव्याने व छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल जव्हार आदिवासींच्या संस्कृतीने नटलेल जव्हार ,मिनी महाबळेश्वर अशी ओळख असणारे जव्हार आदिवासींची संस्कृती जपणारे जव्हार पावसाळ्यात इथलं वातावरण मनाला अक्षरशः वेड लावत तुफान कोसळणारा पाऊस दाट धुकं, फेसाळणारे धबधबे पर्यटकांना अक्षरशः मोहून टाकते ,जव्हारची विपुल वनसंपदा जव्हारला आणखीन समृद्ध बनवते.

ब्रिटिशांकित हिंदुस्थानातल्या महाराष्ट्रातील एक जूनं संस्थान म्हणून जव्हारची ओळख , आजच्या जव्हारला ६३२ वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. जव्हार तालुका पूर्वी संस्थान म्हणून ओळखला जायचा या संस्थानाची स्थापना इस १३०६ मध्ये झाली त्यावर मुकणे घराण्यांनी राज्य केले,जव्हार मध्ये आज ही मुकणे राजांचा जुना वाडा व जय विलास पॅलेस दिसून येतो पुरातन राजवाडा जव्हारच्या इतिहासाची साक्ष देतो तर जय विलास पॅलेस त्याच्या भव्यदिव्यतुन डोळ्यात भरतो.

आता जय विलास पॅलेस जरी खाजगी मालमत्ता असला तरी त्याची भव्यता त्याचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करते
या पॅलेस मध्ये मुकणे राजांची सुंदर तैलचित्रे आहेत तसेच या ठिकाणी जुनं फर्निचर ही जतन करण्यात आले आहे
१०  जून १९४८ पर्यंत जव्हार संस्थान अस्तित्वात होते राजे यशवंतराव मुकणे हे जव्हार संस्थांनचे शेवटचे राजे होते.

जव्हारच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या थोड्याच अंतरावर उजव्या बाजूला तत्कालीन राजांनी बांधलेला हा ऐतिहासिक सूर्य तलाव असून तोअजूनही सुस्थितीत आहे यानंतर आपण प्रवेश करतो तो शंभर वर्षे पूर्ण झालेल्या जव्हार नगर परिषदेच्या प्रांगणात नगरपरिषदेची स्‍थापना श्रीमंत राजे यशवंतराव मुकणे यांनी केली.

त्यांच्या पुतळ्याचे दर्शन आपल्याला लगेच घडते पुतळ्यापासून थोडं उजव्या बाजूने वरती गेले की पुढे प्रसिद्ध हनुमान पॉईंट आहे या ठिकाणी हनुमान मंदिर सुद्धा आहे सूर्योदयाचे सुंदर दर्शन घ्यायचे असेल तर जवळच्या परिसरात आलेला कुठलाही पर्यटक आवर्जून येथे भेट देतो.

या ठिकाणी शांत उभे राहिलात तर निसर्गाचे सौंदर्य तुम्हाला न्याहाळता येतं शहरात गेल्यानंतर छोट्या-छोट्यापण जुन्या संस्थानकालीन इमारती दृष्टीस पडतात नगराच्या मध्यभागी आदिवासी लोकांच्या नृत्याच्या परंपरेचे प्रतीक अर्थात तारपा चौक सुद्धा पाहायला मिळतो इथून पुढे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची सासुरवाडी नजरेस पडते.

सावरकरांनी आपल्या अनेक प्रकारचे साहित्य येथे लिहिले असं सांगितलं जातं आणखी थोडं पुढे गेलं की दिसतो तो राजांचा जुना राजवाडा त्यात प्रवेश करत असतानाच हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतीक असलेल्या एका मंदिराचा दर्शन घडतं हिंदू एकडे येथे येतात ते सदानंद महाराजांचे दर्शन घेण्यासाठी तर मुसलमान सदृद्दिन बाबाचा दर्गा येथे आहे असे मानतात.

जव्हारचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सुरतेवर हल्ला करण्यापूर्वी शिवरायांनी या तालुक्यातल्या शिरपामाळ येथे वास्तव्य केलं होतं त्यावेळी तत्कालीन जव्हारचे राजे विक्रमशहा राजांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घेऊन त्यांना मानाचा शिरपेच दिला त्या ठिकाणाला शिरपामाळ असं म्हटलं जातं. शिरपामाळ हे ठिकाण खूप प्रसिद्ध असून पर्यटक या ठिकाणाला भेट देऊन इतिहास जागा करतात.

जव्हार

वारली चित्रकला ही पालघर जिल्ह्यातील नव्हे तर जगातली एक महत्त्वाची चित्रशैली आहे वारली चित्रशैली ही संस्कृती मानली जाते संस्कृती रूढी परंपरा आणि कर्मकांडाच्या माध्यमातून वारली चित्रशैली उदयास आल्याचे मानतात फार पूर्वी पासुन सामूहिक रीत्या राहिल्यानं समूह शक्तिप्रदर्शन या संस्कृतीतून दिसून येत ईजिपशन व रोमन या दोन्ही संस्कृतींचा मिलाफ म्हणजे वारली चित्रकला असे मानतात.

जव्हार तालुक्याचे आणखी एक मुख्य आकर्षण म्हणजे दाभोसा धबधबा,लेंडी नदीवर हा धबधबा आहे, धबधबाचा अनुभव घ्यायला मुंबई ठाण्यासह राज्यभरातून पर्यटक येत असतात आणि धबधब्यातून उडणारे तुषार अनुभवत एन्जॉय करत असतात.जव्हार शहरात हनुमान पॉइंट, सनसेट पॉईंट,
शिरपामाळ ,दाभोसा धबधबा हनुमान पॉइंट, भुपतगड अशी इतिहास प्रसिद्ध ठिकाण आहेत.

जव्हार नगरीमध्ये फिरत असताना अनेक जुन्या इमारती दिसून येतात जुन्या इमारती या प्रामुख्याने जव्हार संस्थानचे राजे मुकणे महाराजांनी बांधलेल्या असून यामध्ये पोलीस स्टेशन ,कुटीर रुग्णालय ,के व्ही हायस्कूल, पोस्ट ऑफिस ,वाचनालय दिवाणी न्यायालय, सरकारी शाळा आणि विविध सरकारी कार्यालये या सगळ्याचा समावेश आहे हे सगळं तत्कालीन राजांनी बांधलेला आहे.शहराच्या दक्षिणेला बस स्थानक असून याच बस स्थानकावरून नाशिक , ठाणे ,मुंबई,पालघर, सिलवासा , नगर अशा सगळ्या ठिकाणीसाठी बस सुटत असतात.जव्हारमध्ये महाशिवरात्रि ,त्रिपुरारी पौर्णिमा,गणेशोत्सव,नवरात्र, दसरा ,होळी यासारखी उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरे होतात. श्रावण महिन्यात महादेव मंदिर या ठिकाणी दर्शनासाठी अलोट गर्दी होते श्रावणी सोमवारच्या निमित्ताने मंदिरात होणारा शिवभक्तीचा भजनाचे सूर जुन्या राजवाड्यात पर्यंत गुंजतात आणि राजवाड्यातील प्रत्येक चिरा शिवमहिमा ऐकण्यासाठी जिवंत होतो असा हा विविध रंगांनी नटलेला जव्हार तालुका ठाणे जिल्ह्याचे विभाजन झाल्यानंतर पालघरचा एक भाग झाला आहे.

आदिवासी जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असतांना ठाणे जिल्ह्याचे विभाजन झाल्यानंतर, जव्हार जिल्हा होईल अशी ग्वाही दिली होती काही वर्षानंतर जव्हार जिल्हा झालाच नाही झाला तो पालघर आणि जव्हारकरांचे स्वप्न स्वप्नच राहिलं.

१९९६/१९९७ मध्ये राम नाईक रेल्वेमंत्री असताना डहाणू-नाशिक या रेल्वेमार्गाचा सर्वे करण्यात आला होता २४ वर्ष होत आली तरी अजूनही सर्वेक्षणाचा ट्रॅक पुढे सरकलाच नाही.

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या जव्हारला निसर्गानं भरभरून दिले तरी देखील सरकार ते इन्कँश करायला कमी पडते आहे
जव्हारला पर्यटन स्थळांचा दर्जा मिळाल्यास रोजगार उपलब्ध होईल तसेच स्थलांतराचा मुद्दा सुटेल.


हेही वाचा:

लग्नानंतरही या अभिनेत्रीसोबत होते अजय देवगणचे अफेअर, काजोलला कळताच झाले होते असे हाल, वाचा हा किस्सा..

हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *