भारताला कृषी क्षेत्रात आत्मनिर्भर करण्याचं काम वसंतराव नाईक यांनी केलंय…
वसंतराव नाईक हे सलग अकरा वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत. महाराष्ट्र घडवण्यात नाईकांचा सिहांचा वाट राहिला आहे. त्यांचे असे मत होते की, ‘शेतकरी हा कारखानदार झाला पाहिजे.’ त्यांनी शेतीला उद्योगधंद्याची जोड दिली. शेती फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो हे त्यांनी दाखवून दिले. आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी शेतीसाठी अनेक योजना आखल्या आणि कार्यान्वीत केल्या. शेती आणि शेतकरी हा त्यांचा अत्यंतिक जिव्हाळ्याचा विषय होता. वसंतराव नाईक यांचा राजकीय प्रवास हा यवतमाळ जिल्ह्यातील पुसद नगरपरिषद अध्यक्षपदापासून सुरू होतो, मंत्री, खासदार, आणि महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहण्याचा मानही त्यांनीच मिळवला आहे.
शेती आणि शेतीविषयक सर्व बाबी लक्षात घेवून महाराष्ट्राची घडी बसवली. १९७२ चा दुष्काळ, कोयना भुकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तीत विचलीत न होता. धैर्याने निर्णय घेऊन महाराष्ट्राचा गाडा सुरळीत केला. महाराष्ट्राचे सीमा प्रश्न, कृष्णा-गोदावरी पाणी वाटवापर केंद्राला योग्य ती जाणीव करून दिली. कापूस खरेदी मधील एकाधिकार, ज्वारी-तांदूळ खरेदी, रोजगार हमी योजना, इ. अनेक उपक्रम आणि अनेक शेती संदर्भातील योजना राबवून शेतीचे आधुनिकीकरण त्यांनी आपल्या कार्यकाळ केले. म्हणून त्यांना कृषिक्रांतीचे प्रणेते असे संबोधले जाते आणि १ जुलै त्यांचा जयंतीनिमित्त महाराष्ट्र कृषी दिन साजरा केला जात असतो.
वसंतराव नाईक यांनी कृषि विषयक अभ्यासासाठी चीन, जपान, सिंगापूर, श्रीलंका आदी देशात दौरे करून वेगवेगळ्या शेतीपिकांच्या संकरीत वाणांचा स्वतः आधी अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी तेथील शेती वाणांची महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ओळख करून दिली. त्यांच्या प्रयत्नाने कापूस हे नगदी पिक शेतकऱ्यांच्या हाती आले. त्यामुळे पुढे प्रत्येक जिल्ह्यात कापूस जिनिंग, सुतगिरणी, प्रेसिंग, तेलघाणी आदी सहकारी उद्योगांचे जाळे महाराष्ट्रात उभे राहिले.
त्यामुळे शेतकऱ्यांकडे त्यांच्या कष्टाचा पैसा येऊ लागला. शेतकरी अर्थसक्षम झाला. संकरीत वाणाच्या गाई, म्हशींची पैदास करून ती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविली. आणि तसेच दूध डेअरींच्या मार्फत शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय त्यांनी उभारून दिला. शेतकऱ्यांच्या हातात अधिकाधिक पैसा कसा जाईल यासाठी प्रयत्न केले. चिकू, द्राक्षे, केळी, संत्री, लिंबू, मोसंबी आदी फळपिकांवर संशोधन करून शेतकऱ्यांना फळपिकांकडे आकर्षित केले. त्यांनी आपल्या १९५२ ते १९७९ या सत्ताविस वर्षाच्या कार्यकाळात शेती विषयक अनेक महत्वपूर्ण योजना राबविल्या.
आचार्य विनोबांच्या भुदान चळवळीत त्यांनी सहभाग नोंदवून यवतमाळ जिल्ह्यातून त्यांनी १ लाख ३७ एकर शेती दान स्वरूपात मिळवून भुमिहिनांना दिली. राजकीय क्षेत्रात असतांना त्यांनी राज्यात पंचायतराज कायद्याची मुहूर्तमेढ रोवून सत्तेचे विकेंद्रीकरण केले आणि विकासाची गंगा ग्रामीण भागापर्यंत पोहचविली. महाराष्ट्र विकासाचे भगीरथ ठरले.
१९७२ सालच्या दुष्काळात नागरिकांच्या आणि जनावरांच्या अन्नपाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता आशा काळात त्यांनी देशात पहिल्यांदाच रोजगार हमी योजना महाराष्ट्रात राबविण्याचे धाडस केले. सुमारे सात हजारावर विहीरी खोदल्या, मध्यम धरणे, छोटे कालवे खोदली. त्यामुळे त्याकाळी ५० लाखावर ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळाला होता.

शिक्षण हा पवित्र संस्कार आहे. समाज आणि सामाजिक परिवर्तनाची आधारशिला शिक्षण आहे. म. फुले म्हणतात, सगळ्या अनर्थाचे मूळ हे अविद्देत आहे. हे ओळखून शिक्षणाच्या प्रचार-प्रसार करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये खाजगी शिक्षण संस्थेची उभारणी केली. नाईक यांनी आपल्याला हवे तसे सामाजिक बदल करून आणावयाचे असतील तर आपला समाज शिकला पाहिजे. याकडे त्यांनी कटाक्षाने लक्ष दिले. राष्ट्राच्या विकासासाठी आपला समाजाला शेतीकडे लक्ष देण्यास सांगितले, आणि याचं माध्यमातून समाजाला राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आणले. स्वतः शेतात राबून ते शेती करीत असल्याने त्यांची शेती फायदेशीर आणि प्रगत ठरली आहे. शेती व्यवसायामुळे त्यांना आपल्या भटकंतीला आता विराम लाभला, एक स्थिरपद जीवन प्राप्त झाले होते.
बंजारा स्त्रियांच्या पारंपरिक पध्दतीच्या वेशभूषेमुळे नी केशभूषेमुळे स्त्रियांमध्ये अनेक त्वचा रोगाचा उद्भव होत असे. नाईक यांनी या त्वचा रोगाच्या निर्मुलनासाठी एक कला पथक तयार केले होते. या पथकाच्या माध्यमातून पोषाख परिवर्तन चळवळ राबवली होती. या प्रसंगावर प्रा. संजय चव्हाण यांनी ‘द्रष्टे समाज सुधारक’ या लेखात म्हणतात की, “बंजारा समाजातील पोषाख पद्धतीत बदल करावा म्हणून नाईक यांनी गहुली-फुलउमली या गावापासून सुरुवात केली. पोषक बदलावा यामागील त्यांचा हेतू बंजारा संस्कृती, चालीरिती सोडणे असा नव्हता, तर समाजात अमुलाग्र बदल व्हावा हा उद्देश होता.” आणि आशा अनेक समाजसुधारणेचे कार्य वसंतराव नाईक यांनी केलेली आपण पाहू शकतो.
वसंतराव नाईक यांच्या शेतीविषयक कार्याचे कौतुक तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केली होती. त्याचबरोबर त्यांनी याची प्रेरणा घेत रोजगार हमी योजना देशभरात राबविली. शेतकऱ्यांसाठी अविरत झटणाऱ्या या क्रांतदर्शी समाजसुधारक, कृषिक्रांतीचे प्रणेते आणि समाज प्रबोधनकार यांचे १९७९ साली वयाच्या ६६ व्या वर्षी अकस्मात निधन झाले. तद्पश्चात सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी भटक्या, विमुक्तांसाठी उल्लेखनीय काम करणाऱ्यांना समाजभुषण पुरस्कार सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या कृषी विषयक कार्याची दखल घेऊन दरवर्षी १ जुलै या जयंतीदिनी महाराष्ट्र राज्यात कृषिदिन म्हणून साजरा केला जातो.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हेही वाचा:
किस्सा 2013 गाडीचा: याचं गाडीमुळे धर्मवीर आनंद दिघे साहेब दाऊद गॅंगच्या तावडीतून वाचले होते.
हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..